Wednesday, 21 May 2014

हे अश्रू ….


हे अश्रू ….
कदाचित खरे असतीलही …
मात्र तरीही विसरता येत नाहीत
(विसरावं म्हणतो आताशा )
ते अश्रू …
जेव्हा तुमच्या रथचक्रातून
उडाल्या होत्या ठिणग्या ,
ज्यांनी खाक केला होता
हजारो वर्षांचा विस्वास , जिव्हाळा
तुमच्या राजपथावरील यात्रेत चिरडले गेले होते कित्येक कष्टकरी जीव
बेघर , भणंग
बहुजन युवकांची भडकली होती माथी
शांतीधर्माच्या अनुयायांनी
पेटविली होती रेल्वे
आणि मर्यादा पुरुषोत्तमाच्या मुलांनी
चिरले होते गर्भवती मातेचे पोट
जेव्हा
जिवलग मित्रांमध्ये
दाटून आले होते मळभ
आणि फुंकला गेला होता पांचजन्य
आपल्याच चुलत भावंडानविरुध्द
तेव्हा
एक 'हिन्स्र' नाटककार
उच्चारून गेला होता शापवाणी ….
"माझ्याकडे बंदूक असती तर मी एकाच व्यक्तीला मारले असते ……"
हि वांझ शापवाणी उच्चारताना
त्याच्या डोळ्यात तरळलेले
ते अश्रू .....