Tuesday 23 December 2014

स्टँटीक बॉक्स

  

                                                                               -----  ©   -डॉ . अमित शिंदे 
                                      "कॉंग्रेजुलेशन , छान एम्ब्रियो तयार झालाय . आता याचे नीताच्या गर्भाशयात रोपण केले कि शी विल बे प्रेग्नंट! " असे मी जेव्हा नीता आणि अनिकेत यांना सांगितले तेव्हा त्यांच्याकडून मला अपेक्षित असलेली कुठलीही आनंदाची प्रतिक्रिया आली नाही . उलट मोठ्या पेचात सापडल्याचे भावच त्यांच्या चेहऱ्यावर उमटले .
                                       नीता आणि अनिकेतला मी खूप वर्षांपासून ओळखतो . दोघेही अतिशय हुशार आणि उच्चशिक्षित होते . कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांच्या प्रेमात असले आणि घरच्यांची त्यांच्या प्रेमाला पूर्ण संमती असली तरी त्यांनी लग्न तसे फार उशिरा केले होते . दोघेही प्रचंड करीयरीष्ट . दोघांनाही आय . टी . सेक्टर मध्ये चांगला जॉब होता . त्यातही निता अतिशय महात्वाकांशी होती . त्यामुळेच जॉब मिळाल्यावर जेव्हा अनिकेतने तिला प्रपोज केले तेव्हा तिने स्पष्ट सांगितले कि ती जर्मनीत एम . एस. करायला जाणार आहे . तिथून परतल्यावरच लग्नाचा निर्णय घेईल . जर्मनीत गेल्यावर  एम . एस . कम्प्लीट होता होता तिला जर्मन अकॅडेमिक एक्चेंज सर्विसेस ची रिसर्च  फेलोशिप मिळून ती बर्लिन युनिव्हर्सिटीत डॉक्टरेट करण्याकरिता गेली . तेव्हा खरेतर सर्वांनी अनिकेतला तिचा नाद सोडून लग्न करून घेण्याचा सल्ला दिला होता . पण त्याचेही करियर ऐन भारत होते आणि लग्न हि त्याची प्रायोरिटी नव्हतीच . त्यामुळे दोघेही स्थिरस्थावर झाल्यावर लग्न करेपर्यंत दोघाची पस्तीशी केव्हाच उलटून गेली होती .
                                               दोघांना जॉब मिळाले ते वेगवेगळ्या शहरात . त्यामुळे सुरुवातीला काही वर्षे प्लॅनिंग. मग एकाच शहरात दोघांचे जॉब अँड्जस्ट झाल्यावर फ्लॅट, कार झाल्यानंतर दोघांना बाळाचे वेध लागले . पण सहा महिने प्रयत्न करूनही दिवस जाईनात  म्हणून ते  दोघे माझ्याकडे ट्रीटमेन्ट साठी आले  . तसा मी त्यांचा फॅमिली गायन्याँकॉलॉजिस्ट असल्याने मी त्यांना लहानपणापासून  ओळखत होतो. दोघांच्याही टेस्ट नंतर असे लक्षात आले कि चाळीशीच्या जवळ पोहोचलेल्या अनिकेतच्या विर्यात शुक्राणूंची हालचाल आणि गती कमी झाली होती . बदलत्या जीवनशैलीचे तणावही याला कारणीभूत होते . निताचेही ओव्हुलेशन नियमित होत नव्हते . प्राथमिक तपासण्यांनंतर मी त्यांना आय . व्ही . एफ . अर्थात टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेन्टचा सल्ला दिला .
                             आय . व्ही . एफ . च्या पहिल्या दोन सायकल्स अयशस्वी झाल्यानंतर जेव्हा तिसऱ्या सायकलमध्ये गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा साहजिकच त्यांना खूप आनंद होईल अशी माझी अपेक्षा होती .पण " अरे बापरे ! हा मोठाच प्रश्न उभा राहिला ." या अनिकेतच्या उद्गाराने मला बुचकळ्यात टाकले .
" का ?तुम्हाला आनंद नाही झाला ?" मी त्यांना विचारले .
" आनंद झाला डॉक्टर ! पण झालं असं कि आमच्या कंपनीचे  न्यू योर्क च्या आय . बी . एन .शी काही टाय अप्स झाले आहेत . त्यानुसार मला पुढच्या महिन्यात यु . एस . ला पाठविण्याचे मँनेजमेन्ट ने ठरविले आहे . अॅन्ड इट्स अ लाइफ टाइम ऑपरचुनिटी फॉर मी. " नीता म्हणाली .
" पण भारतातच सेटल व्हायचा निर्णय तुम्ही मागेच घेतला होता ना ?" मी विचारले .
" यु . एस . मध्ये सेटल व्हायचा काही विचार नाही . पण हि संधी सोडली तर माझ्यासारखी मूर्ख मीच ठरेन  . दोनच वर्षांचा प्रश्न आहे पण भारतात परत आल्यावर ; माय करियर विल बी फ्लश  वीद सक्सेस . शिवाय प्रेग्नन्सिच्या कारणाने मी जर नकार दिला तर मँनेजमेन्टवर वाईट इम्प्रेशन पडेल आणि माझ्या करियरला कायमची खीळ बसेल . दे मे इवन फायर मी ." निता उत्तरली .
"तुमच्या वैयक्तिक निर्णयात मी ढवळाढवळ करू शकत नाही . पण हा एम्ब्रियो जर आपण इम्प्लांट केला नाही तर नंतर पुन्हा प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता खूप कमी आहे . एक डॉक्टर या नात्याने या गोष्टीची कल्पना तुम्हाला देणे हे मी माझे कर्तव्य समजतो ." मी दोघांना निर्वाणीचा इशारा दिला .
" डॉक्टर आम्हाला बाळ हवय हो ! असं नाही का करता येणार ? हा एम्ब्रियो तसाच ठेऊन नीता न्यू योर्क वरून परत आल्यावर तो तिच्या गर्भाशयात इम्प्लांट करायचा ?" अनिकेतने विचारले .
" हो , तसे तंत्रज्ञान आहे . त्याला एम्ब्रियो फ्रीझिंग असे म्हणतात . टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेन्टच्या वेळेस जेव्हा एकापेक्षा अधिक भ्रूण तयार होतात तेव्हा त्यापैकी एकाचे रोपण स्त्रीच्या गर्भाशयात करून उरलेले भ्रूण गोठविले जातात . गरज पडल्यास ते पुढच्या वेळेस स्त्रीच्या गर्भाशयात सोडता येतात किंवा काही जोडपे असे भ्रूण दुसर्या जोडप्यांना डोनेटही करतात . पण त्यात काही धोके आहे . हे तंत्रज्ञान कधीकधी अपयशीही ठरू शकते ." मी कल्पना दिली .
" आम्ही तयार आहोत डॉक्टर , शिवाय दुसरा पर्यायही नाही आहे ." नीता उत्तरली .
*******************
त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी नीता भारतात परतली . आता मात्र दोघांनाही नव्या पाहुण्याची उत्कंठा लागून राहिली होती . फ्रीझ केलेला एम्ब्रियो नीताच्या गर्भाशयात इम्प्लांट करण्यात आला . मला त्यात व्यंग निर्माण होण्याची भीती होती . सुदैवाने सर्व टेस्टस  पॉझीटिव्ह आल्या . गर्भाच्या वाढीवर माझे सोनोग्राफी द्वारे बारीक लक्ष होते . माझा प्रयोग यशस्वी झाला होता . सर्व काही व्यवस्थित होते . दिवसांमागून दिवस जाऊ लागले . डीलेवरीची तारीख जवळ येऊ लागली . एके दिवशी अचानक अनिकेतचा मला फोन आला . त्या दोघांना मला अर्जंट भेटायचे होते . गर्भाचीच काही समस्या निर्माण झाली असावी असे मला वाटले . मी त्यांना अपॉइन्टमेन्ट दिली .
" डॉक्टर , आपल्याला हि डीलेवरी पुढे नाही का ढकलता येणार ?" माझ्यासमोर बसल्या बसल्या अनिकेत म्हणाला .
" अरे हि बाळाची डीलेवरी आहे . निर्जीव मालाची नाही . " मी जर रागानेच म्हटले .
" सॉरी डॉक्टर . पण आम्हालाही बाळाची ओढ आहेच ना ! प्रॉब्लेमच तसा उभा राहिला आहे . रिसेशन मुळे नुकताच माझा जॉब गेलाय . बदललेल्या कामगार कायद्यांमुळे नीताला प्रेग्नन्सी लिव्ह मध्ये कुठलाही पगार मिळणार नाहीये . तेव्हा वी कान्ट अफोर्ड अरायवल ऑफ न्यू मेंबर इन अवर फॅमिली." अनिकेत ने समस्या सांगितली .
" हे बघ अनिकेत, दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०६० पर्यंत असे करता येत नसे . पण तुमच्या सुदैवाने असा शोध नुकताच लागला आहे . गर्भ जिवंत ठेऊन त्याची वाढ थांबवून डीलेवरी पुढे ढकलण्यासाठी एक इंजेक्शन मिळते . हे इंजेक्शन दर महिन्याला शिरेद्वारे घ्यावे लागते ." मी पर्याय सांगितला . दिवसेंदिवस कुटुंबसंस्था उध्वस्थ होत चालली आहे . एकमेकांना मदत करणे , नातीगोती सांभाळणे या सगळ्याला मागच्या शतकातच आहोटी लागली होती . आता तर या गोष्टी पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत . त्यामुळे प्रसुतीसारख्या घटनाही आयुष्यात खूपच ताण तणाव वाढवतात . आमच्या आयुष्यातील नेहमीच्या घटनाही बाजारपेठेच्या नियामांनीच नियंत्रित होऊ  लागल्या आहेत . म्हणतात ना , गरज हि शोधाची जननी आहे ! लोकांच्या गरजा लक्षात घेऊन असे संशोधन होऊ लागले आहे .
                                      नीताने हा इंजेक्शनचा पर्याय स्वीकारला . अवघडलेल्या स्थितीत नीता ऑफिसला जाऊ लागली . अनिकेतला नवी नोकरी मिळालीच नाही . पुढे त्याने स्वतःचा बिझनेस सुरु केला . व्यवसायात स्थिरस्थावर होईपर्यंत दोन वर्षे निघून गेली . दोन वर्षानंतर त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला . एव्हाना नीताची चाळीशी उलटून गेली होती . या वयातील बाळंतपण, त्यातही पहिली खेप , खूपच धोकादायक असते . अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा पूर्ण वापर करून तिचे सिझेरियन करण्यात आले . बाळ बाळंतीन यातून सुखरूप बाहेर पडल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला .
**************
त्यानंतर तीन महिन्यांनी मी स्वित्झर्लंडला सहलीला गेलो. तिथे अनपेक्षितपणे अनिकेत आणि नीता मला एका रिसोर्ट मध्ये भेटले . दोघेही सुटीची मजा घेत होते . पण त्यांच्यासोबत त्यांचे बाळ दिसत नव्हते .
"अरेच्चा ! तुम्ही इथे कसे ? आणि बाळ कुठे आहे ? " मी विचारले .
"काही नाही डॉक्टर . गेली काही वर्षे खूपच धावपळीची होती . त्यानंतर नीताची डीलेवरी ! बाळानेही सुरुवातीला खूप त्रास दिला . रात्र रात्र झोपत नसे . दोन अडीच वर्षांच्या प्रेग्नन्सीने नीताची पाठही खूप दुखायची . बाळाला बाहेरचं दुध लवकरच सुरु करण्याचा आम्ही डिसिजन घेतला . पण त्यानेही बाळाला सुरुवातीला खूप जुलाब झाले . या सगळ्याचा खूप स्ट्रेस आला होता . म्हणून म्हटलं ; लेट्स टेक अ ब्रेक . " अनिकेत सांगत होता.
" मग बाळाला काय पाळणाघरात ठेवले ?" माझा प्रश्न .
"नाही स्टँटीक बॉक्स मध्ये ठेवले ." अनिकेत उत्तरला .
"स्टँटीक बॉक्स?" मी आश्चर्याने विचारले .
"हुं , नुकताच शोध लागलाय त्याचा . इंडियात अजून मिळतही नाही , खास यु. एस . मधून मागविला हा बॉक्स आम्ही  . " अनिकेत सांगू लागला .
"मी समजलो नाही . स्टँटीक बॉक्स हा शब्द प्रथमच ऐकतो आहे मी . " मी म्हणालो .
" तुम्हाला माहित आहेच , हल्लीचं आयुष्य कसं डिमांडिंग आहे ते . आणि मुल वाढवणं काही कमी हेक्टिक काम नाही . त्यामुळे संशोधकांनी हा बॉक्स तयार केला आहे . या बॉक्स मध्ये मुल घातलं कि ते फ्रीझ होतं . त्याचा श्वासोश्वास , हृदय सुरु राहते पण ते हालचाल करीत नाही . या काळात ते अतिशय कमी उर्जा वापरते . त्यामुळे त्याला अन्नाचीही गरज नसते . याकाळात त्याचे वय सुद्धा स्थिर राहते . एकप्रकारच्या सुप्तावस्थेत जाते ते . दरम्यान पालक आपापली  महत्वाची कामे करून घेऊ शकतात . बॉक्स मधून बाहेर काढतात त्याची स्मृती आणि हालचाली पूर्ववत होतात .हिवाळ्यात अन्न मिळत नाही तेव्हा बर्फाळ प्रदेशातील प्राणी आणि गोठलेल्या तळ्यातील बेडूक हेच तंत्र वापरतात .  आमच्यासारख्या बिझी पालकांसाठी एक वरदानच आहे हा बॉक्स . या बॉक्स मध्ये काही तासांपासून काही वर्षांपर्यंत कितीही वेळ आपण बाळ ठेऊ शकतो . " अनिकेतने सांगितले .
***********************
त्यानंतर वर्षांमागून वर्षे गेली . मी माझ्या वयाची नव्वदी केव्हाच ओलांडली आहे . वाढत्या वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्यमान वाढले . साहजिकच प्रदीर्घ कंटाळवाणे म्हातारपण नशिबी आले . एकदा संध्याकाळच्या वेळेस पेन्शनर्स पार्क मध्ये गेलेलो असता एक सत्तरीचे जोडपे एका दोन अडीच वर्षाच्या लहान मुलाला खेळवत होते.
" अरे वा ! नातू वाटतं ?" मी सहज गप्पा माराव्यात म्हणून म्हणालो . आताशा एकमेकांशी प्रत्यक्ष बोलणे हि गोष्टच नामशेष झाली आहे असे वाटत होते . अहो शेजारी पाजारी सोडा पण नवरा बायको , बाप मुलगा हे देखील एकमेकांना व्हर्चुअल जगातच भेटत . त्यामुळे बाळाला खेळविणारे आजी आजोबा पाहून मला जरा अप्रूपच वाटले .
"अहो डॉक्टर तुम्ही ! ओळखलं नाही का आम्हाला ?" त्यातल्या स्त्रीने विचारले .
"वयोमानाप्रमाणे स्मृती  जरा  क्षीण झाली आहे खरी ! नाही ओळखू येत चेहरे लवकर ." मी ओळखण्याचा निष्फळ प्रयत्न करीत म्हणालो ." जुने पेशंट असे अवचित भेटतात आणि पंचायत होते .
"अहो मी अनिकेत , हि निता . तुम्हीही कसे ओळखणार म्हणा ! पंचवीस वर्षे केव्हाच उलटून गेली असतील भेटून . " खरेच कि , पांढरे केस आणि जीर्ण चेहेर्यातून मला हळू हळू ओळख पटू लागली  .
" ओह हो ! कमाल आहे ! त्या वेळेस इन्फर्टीलिटी ची ट्रीटमेन्ट घेणारे तुम्ही असे नातवाला खेळाविताना बघून खरेच आनंद वाटला . " मी समाधानाने म्हणालो .
" नाही डॉक्टर ! हा नातू नाही आमचा . हा तोच मुलगा आहे . तुमच्या  ट्रीटमेंट ने झालेला . विश्वजित ." नेहा म्हणाली. मी बुचकळ्यात पडलो .
"पण तो तर आता सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा असेल न ?" मी विचारले .
यावर दोघेही काही क्षण गप्प झाले . मग अनिकेत अपराधी चेहऱ्याने सांगू लागला . " ती आमची एक चूकच झाली . तुम्हाला तर माहित आहे . त्या काळात आम्ही प्रचंड बिझी होतो . माझा व्यवसाय नुकताच जोर पकडू लागला होता आणि नेहा करीयरच्या सर्वोच्च शिखरावर होती . सारख्या मिटींग्स , कॉनफ़रन्सेस, क्लाएनट्सशी चर्चा भेटीगाठी सतत चालू असायच्या . शिवाय कामाचाही प्रचंड स्ट्रेस असायचा . तेव्हा नुकताच मार्केटमध्ये लॉन्च झालेल्या  स्टँटीक बॉक्स चा आम्हाला खूपच आधार वाटू लागला . डेड लाईन चार दिवसांवर आली ? टाका बाळाला बॉक्स मध्ये . मिटिंग मध्ये महत्वाचं प्रेझेन्टेशन द्यायचे आहे ? टाका बाळाला बॉक्स मध्ये. चार दिवस बिझनेस टूर वर जायचं आहे ? टाका बॉक्स मध्ये . सुरुवातीला दोन चार दिवसांचा असलेला स्टँटीक बॉक्स मध्ये बाळाला टाकण्याचा कालावधी नंतर नंतर वाढू लागला . आजारपण , धंद्यात नुकसान , जॉब बदलणे , आलेले नैराश्य या कारणांनी विश्वजित महिनोंमहिने बॉक्स मध्ये राहू लागला . त्याची शी शु काढणे , आजारपणात रात्र रात्र जगणे , त्याचे मूड्स सांभाळणे या सगळ्यांसाठी त्या काळात आमच्याकडे वेळच नव्हता . कधी जागेची कमतरता , कधी आर्थिक अस्थिरता यामुळे आपण त्याला दर्जेदार सोई सुविधा देण्यात कुठे कमी पडू नये असे वाटायचे . मध्यंतरी काही वर्षे सतत युद्धाचे वातावरण होते . त्याचा दुष्परिणाम विश्वजितवर होऊ नये असे वाटायचे . त्यामुळे त्याला त्या काळात पूर्ण वेळ   स्टँटीक बॉक्स मध्येच ठेवले होते . कधी कधी आपण आपल्या जबाबदारीतून पळ काढतोय असं वाटायचं . पण हे सगळे आपण विश्वाजीतच्या भल्यासाठीच करतोय या विचाराने अपराधी भाव कमी व्हायचा. आपण मुलांना या जगात जन्माला घालतो पण आपली मुले आनंदाने वाढू शकतील असं जग कुठे आपण त्यांना देऊ शकतो ? आज ना  उद्या परिस्थिती  बदलेल , आपण आपल्या मुलाला अधिक चांगल्या जगात वाढवू असं वाटायचं . पण त्याचा परिणाम उलटाच झाला . आज आम्ही दोघांनी साठी ओलांडली मात्र आमचे बाळ अजून अडीच वर्षांचेच आहे . बाकी परिस्थिती  जैसे थे आहे . काल ज्या समस्या आमच्या पुढे होत्या त्या आजही आहेत . हे आमच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा आम्ही स्टँटीक बॉक्स फोडूनच टाकला . जग तर आपण बदलू शकत नाही मग आपणच बदलायचंआपल्या मुलांना अधिक चांगल्या काळात वाढविण्याऐवजी आहे त्या परीस्थितीत समाधान शोधायला आम्हीही शिकत आहोत आणि त्यालाही शिकविणार आहोत . "
                                              या सगळ्याशी अनभिज्ञ एकटाच स्वतःच्या विश्वात मश्गुल होऊन खेळणाऱ्या विश्वजीतकडे पाहून माझे डोळे भरून आले . तो आता स्टँटीक बॉक्स मध्ये नाही.  मात्र खेळात मग्न झाल्याने काळ जणू त्याच्यासाठी स्तब्द झाला आहे . त्याला काळजी फक्त या क्षणाची आहे . पण हा हळू हळू मोठा होईल . स्पर्धेचं युग त्याच्यावरही आपला अंमल चढवेल . तोही या उंदरांच्या शर्यतीत अथक धाऊ लागेल. मग त्याला आपल्या अति वृद्ध पण पुढारलेल्या विज्ञानाने आयुष्यमान वाढलेल्या आई वडिलांची अडचण होऊ लागेल . विश्वजित मोठा होऊन आपल्या आई वडिलांना वारंवार  स्टँटीक बॉक्स मध्ये टाकतो आहे आणि हळूहळू त्यांना स्टँटीक बॉक्समधून कधीच न काढण्याचा निर्णय त्याने घेतला आहे असे चित्र मला स्पष्ट दिसू लागले . 


Thursday 18 September 2014

                                               बकुळेची वाव 

                                                                         डॉ. अमित शिंदे 

"प्लीज़ सर, मला  खरंच  नाही जमणार यायला; स्वीटीची एक्झाम आहे आणि तिच्याकडे बघायला घरी कोणीच नाही. "
रोझी ; माझी पर्सनल सेक्रेटरी मला कळवळून विनवत होती . मी तिच्याकडे रोखून बघितले आणि म्हणालो ,
" हे बघ रोझी ;नीट विचार कर; तुझं प्रमोशन ड्यू  आहे आणि ते सगळं माझ्या हातात आहे . तुला गरजही  आहे पैशाची . तेव्हा नकार देण्याआधी विचार कर."
 लहान वयात घरच्यांच्या विरोधात लग्न करून फसलेली , आणि ऐन बवीशीत एका शाळकरी मुलीची आई असलेली रोझी एकटीच राहत होती .
                                        आणि मी असं  सावज हातचं जाऊ देणार नव्हतो!
                                         रोझी माझ्याकडे जॉईन होऊन काही महिनेच झाले होते . तिचे काम चोख होते आणि वागणे बोलणे चटपटीत . टापटीप राहण्याची तिला आवड होती . पण प्रमोशन मिळण्यासाठी तेवढे  पुरेसे नसते हे तिला अजून कळायचे होते .
                                          सातारा हायवेपासून जवळच  , महाबळेश्वरच्या जरा अलीकडे सरदार खाजगीवाले यांची पुरातन गढी  होती . या गढीचे रुपांतर फाईव स्टार रिसोर्ट मध्ये करण्याची त्यांच्या नातवाची इच्छा होती . त्यादृष्टीने तिथे तीन दिवस राहून , गढीची निट  पहाणी  करून प्राथमिक डागडूजीला लगेच सुरुवात करावी या उद्देशाने मी तिथे निघालो होतो . मागच्या एक दोन साईट व्हिजिटला रोझी माझ्या सोबतच असायची . तेव्हाच मी तिची चाचपणी करून ठेवली होती . डिक्टेशन देण्याच्या निमित्ताने ओझरता स्पर्श आणि सूचक बोलणे यांतून माझा हेतू तिच्यापर्यंत पोहचविला होता आणि तिचा पूर्ण अंदाज घेऊन ठेवला होता . त्यामुळेच यावेळेस माझ्यासोबत यायची रोझीची तयारी नव्हती .पण तिच्यासमोर दुसरा पर्याय तरी कुठे होता ? अननुभवी मुलीला कोण नोकरी देतंय ? आणि तेही आमच्यासारख्या नामांकित ग्रुप मधून हाकललेल्या !!
************
                                         आमची स्कॉर्पियो साईटवर पोहचली तेव्हा संध्याकाळ होत आली होती . गढी  गावापासून काही अंतरावर होती . गढीसमोर   भलंमोठं मोकळं मैदान होतं . निर्जन पहाडाच्या पायथ्याशी हि जुनाट गढी  एकटीच उभी होती . जवळपास मनुष्यवस्ती फारशी नव्हती आणि गावठाण जणू गढीच्या धाकाने अदबीने दूर वसले होते . जंगलावरून येणाऱ्या थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर हलका शहारा आणीत होती .  आमची गाडी थांबली आणि घरट्याकडे परतणारा सायंकालीन पक्ष्यांचा थवा  आमच्या डोक्यावरून किलबिल करीत उडत गेला . गढीकडे  बघताच  माझी तबियत खुश होऊन गेली . पण इतक्या शांततेची सवय नसल्यामुळे म्हणा किंवा या ओसाड दगडी गढीच्या निर्जनपणामुळे म्हणा रोझीच्या मनावर एकप्रकारचा दबाव आल्यासारखे वाटत होते .
                                          खाजगीवाले यांचा नातू सध्या यु. एस . मध्ये असतो आणि गढीची व्यवस्था देशपांडे नावाचे गृहस्थ बघत असत . आमची गाडी पोहोचताच ते लगबगीने सामोरे आले . हिरव्यागार कुरणात गाडी पार्क करून आणि गढीची तटबंदी ओलांडून आम्ही आत आलो . तटाला अजस्र सागवानी दरवाजा होता . त्याला लोखंडी खिळे  बसविलेले होते . आतून भलामोठा लाकडी अडसर लावलेला होता . दिंडी दरवाज्यातून आम्ही आत गेलो .आत पहारेकऱ्याची देवडी आणि नगारखाना होता . समोर मुख्य वाड्याभोवती नीट निगा न राखलेली बाग होती .  देशपांड्यांचा स्वभाव चांगलाच गप्पिष्ट असावा . हे सरदारांचे पिढीजात मुनीम . गढीचे कौतुक किती करू आणि किती नाही असे त्यांना होऊन गेले होते . त्यांची बडबड ऐकत आम्ही गढी बघू लागलो . तटाच्या आत केळी , पेरू आणि आवळ्याची कितीतरी झाडे लावून बाग तयार केलेली होती . ' या बागेला भूमिगत खापरी नळांतून नदीचे पाणी दिलेले आहेत . इथे पूर्वी कारंजी उडत असत . काय थाट सांगावा त्यावेळचा ! अहो आमचे रावबहाद्दूर रावसाहेब खाजगीवाले म्हणजे रसिक माणूस . एकदा बालगंधर्व स्वतः आले होते इथं , तेव्हा हा हौद गुलाबपाण्याने काठोकाठ भरून फवारे उडविले होते म्हणतात . गेले ते दिवस ! आता हि कारंजी उडत नाहीत . ती गाणी ऐकू येत नाहीत आणि तसल्या तुपाचे ओघळ वाहणाऱ्या पंगती झडत नाहीत . अहो एव्हडी मोठी बाग सांभाळायला माळी सुद्धा मिळत नाही आजकाल.  आमचा जुना सत्तू गडी आहे म्हणून आपलं चाललंय कसं  तरी . आता हे ठिकाण म्हणजे माझ्यासारख्या सडाफटिंग कारकुनाचे भलेमोठे पण भकास असे निवास्थान मात्र बनले आहे . ह्या ह्या ह्या !' देशपांडे स्वतःच्या विनोदावर हसत होते .
                                     बाग ओलांडून आम्ही वाड्याच्या ओसरीवर गेलो . तिथे वेताच्या खुर्च्या टाकून चहापाण्याची व्यवस्था केलेली होती . चहा घेताघेता मी देशपांड्यांची रोझीशी ओळख करून दिली , " हि माझी सेक्रेटरी कम असिस्टंट रोझी , हीदेखील दोन दिवस माझ्याबरोबरच इथे राहणार आहे ."
" अरे वा वा ! निस्संकोच राहा . सत्तू , अरे सत्तू जा बाबा रखमाला सांग; म्याडमची व्यवस्था नीट  कर म्हणून .तुम्ही काही काळजी करू नका रोझी म्याडम . आमची रखमा आहे तुम्हाला हवं नको ते बघायला . रखमा म्हणजे या सत्तूची बायको हो! " देशपांडे म्हणाले .
"चांगलं आहे . का हो देशपांडे , किती जुनी असावी हि गढी ?"मी विचारले .
" अहो जुनी म्हणजे काय ? म्हटलं तर मलिकंबरच्या जमान्यातली .पण धाकल्या बाजीरावाच्या दरबारात होते सरदार अप्पासाहेब खाजगीवाले. म्हणजे रावसाहेबांचे आजोबा . म्हणजे आमच्या साहेबांचे खापर पणजोबा म्हणाना ! अप्पासाहेब म्हणजे रावबाजीच्या खास  मर्जीतले सरदार . हे समोरचे बुरुज , घोड्यांच्या पागा  आणि हि तटबंदी त्यांनी बांधून घेतली . वरच्या काही खोल्या आणि मागची वाव मात्र रावसाहेबांनी बांधली . रावसाहेब म्हणजे साहेबांचे आजोबा हो ! चला, दाखवितो तुम्हाला ." देशपांडे उत्साहात म्हणाले .
                                          चहापाणी आटोपताच वेळ न दवडता आम्ही गढी  निरखू लागलो . ओसरीतून आत जाण्यासाठी पुन्हा एक सागवानी दरवाजा होता . याला पितळी चकत्या लावलेल्या होत्या . आत ऐसपैस चौक होता . " असे एकूण चार चौक आहेत वाड्याला " देशपांडे सांगत होते . समोरच बैठकीवर तक्के , लोड, गाद्या गिरद्या अंथरलेल्या होत्या . डाव्या  ओवरीत  कारकुनाचा फड आणि उजवीकडे देवघर होते . त्याला लाकडी जाळी बसवलेली होती. सगळीकडे ट्युबलाईट बसविलेल्या असल्या तरी जुन्या मशाली अजून तशाच अडकविलेल्या होत्या . आत गेल्यावर माडीवर जाण्यासाठी अंधारा चिंचोळा जिना होता . जिन्याजवळ धान्याची कोठारे आणि माजघर होतं . जिना चढतानाच चढणार्याच्या मनात धसका बसविणारा तळघरात उतरणारा जिना दिसतो . जवळच  भिंतीवर एक असूड  टांगलेला ! आत भिंतींना पुरुषभर उंचीवर ठोकलेल्या लोखंडी कड्या ! तळघर पाहून दडपलेली छाती जिन्याची उभी चढण चढताना अधिकच धपापून जात होती . सदरेवर बोलावलेल्या गरीब कुनब्यांची आधीच भीतीने गाळण उडावी म्हणून मुद्दाम अशी व्यवस्था केलेली असावी .
                वरच्या बाजूला मोठी सदर होती .  भिंतीवर ढाल तलवारी अडकविलेल्या होत्या . अनेक पूर्वजांची  मोठाली तैलचित्रे तिथे लावलेली होती .त्या तैलचित्रातले झुबकेदार मिशावाले पुरुष आणि सोन्याच्या दागिन्यांनी वाकलेल्या भरजरी साडीतल्या खानदानी स्त्रिया जुन्या वैभवाची साक्ष देत होत्या . अनेक महिरपी गावाक्षांनी हा भाग हवेशीर ठेवला होता ." काय दरारा होता रावसाहेबांचा ! गढीवर नुसतं  बोलावलं तरी पंचक्रोशीतील लोकांची भीतीने नुसती गाळण उडायची . हा उभा जिना चढून वर आलं कि समोरच रावसाहेब या बैठकीवर नाहीतर या इथं झोपाळ्यावर सुपारी कात्रीत बसलेले दिसत . काय रुबाबदार मूर्ती ! हि बघा त्यांची तसबीर ." देशपांडे भक्तिभावाने सांगत होते .
             चित्रात खरोखर एक धिप्पाड शरीराचा आणि करारी चेहऱ्याचा पुरुष हातात चांदीची मुठ असलेली छडी घेऊन उभा होता . लांब अंगरखा त्यावर किनखापी कलाबुताच नक्षीकाम ; छातीवर इंग्रज सरकारने दिलेल्या पदकांची रांग; सोनेरी वर्ख दिलेल्या एकसारख्या वीसएक गुंड्या ; खांद्यावर झिरमिळ्या ; काल्लेदार मिशा ; कोशाचा फेटा त्यावर मोत्यांची लड ; पायात चढाव आणि सगळ्यात वरतान  म्हणजे रोखून पाहणारे करारी डोळे . तसबिरीतून थेट आपल्या मनात डोकावताहेत असे वाटणारे.
                    "रावसाहेब म्हणजे एक दिलदार माणूस .जुन्या पिढीतले गावकरी अजूनही त्यांच्या आठवणी सांगतात .इग्रज सरकारने रावबहाद्दूर पदवी दिली होती त्यांना .  हजारो एकर जमीन . नाटकाचे मोठे शौकीन . शिकारीचा तर भयंकर नाद . बंदुकीचा नेम कधी चुकला नाही . हा पहा शिकारखाना . हा वाघ बघा . गावातली साताठ माणसं मारली होती त्याने . शेवटी रावसाहेब बहाद्दूर गेले मागावर . बरोबर रान उठविणारे हल्कारे . संध्याकाळच्या वेळेस नदीवर आला होता पाणी प्यायला .  रावबाहाद्दुरांनी एका गोळीत लोळवला . हि पहा गालाजवळ गोळीची खुण . ओहो एकदातर गम्मतच झाली . माल्कम साहेब म्हणून होता एक कलेक्टर शिकारीचा शौकीन . असेच रावसाहेब रावबहाद्दूर त्याच्यासोबत शिकारीला गेले होते . कोठूनसे एक रानडुक्कर आले थेट सहबावर धावून . साहेबाची हि गाळण उडाली म्हणता ; अहो भंबेरीच म्हणाना . पण आमचे रावसाहेब कसले खंबीर . बरची होती बरोबर ती नेम धरून अशी फेकली म्हणता …. डुक्कर जागेवर खलास ! अहो साहेबाला कळलच नाही मिनिटभर ! …. " देशपांडेंची रसवंती चांगलीच रंगात आली होती . त्यांचे किस्से ऐकत आणि छतावरची झुंबरे निरखत आम्ही ऐने महालात आलो . तिथं  वेगवेगळे  नक्षीदार आरसे , श्रीकृष्णाच्या रासलीलांचे रविवर्म्याची चित्रे , छपरी पलंग असा सगळा थाट होता . जुना ग्रामोफोन बंद पडलेला होता . सोबत बालगंधर्वांच्या अनेक तबकड्या होत्या. माझे लक्ष भिंतीवरच्या एका चित्राकडे गेले . चित्रात एक तरुण स्र्त्री  नउवारी पातळात दिसत होती . हि स्त्री इतर खानदानी  बायकांहून वेगळीच वाटत होती . तिच्या चेहेर्यावर गर्वोन्नत घरंदाज भाव नव्हते पण एक निराळाच गोडवा होता . अंगावरचे कपडेही फारसे उंची नव्हते . चित्राखाली बकुळा असे लिहिलेले होते .
                           " हि कोण ? " रोझीने  मधेच विचारले . ग्रामोफोनच्या तबकड्या दाखविण्यात मग्न असलेले देशपांडे अचानक थबकले . त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले . " हि बकुळा: या गढीत बटकी होती . " ते म्हणाले . बटकी म्हणजे मोलकरीण  नं ? मोलकरीणीचे चित्र कोणी काढले ? " तिने पुन्हा विचारले . देशपांड्यांना याचे उत्तर द्यायचे नव्हते. त्यांनी विषय बदलला . मग तिनेही अधिक विचारले नाही . पण बकुळेचे निरागस डोळे  नंतरही कितीतरी वेळ माझ्या मनातून जात नव्हते .
                                        त्यानंतर आम्ही गढीचा जिना उतरून मागच्या बाजूच्या चौकात आलो . इथे स्वयंपाकघर आणि हौद होते . चौकात तुळशी वृंदावन होते . " हा सत्तु  आणि हि त्याची बायको रखमा . " देशपांड्यांनी तिथे भल्यामोठ्या चुलखण्डावर  पातेले चढवत असणाऱ्या मध्यमवयीन  माणसाकडे निर्देश केला . त्याची बायको रखमा आमच्या रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करीत होती . " रखमा ! आता दोन दिवस ताईसाहेबांची जबाबदारी तुझ्यावर  !" देशपांडे खाली मान घालून कांदे चिरत असलेल्या राखामाकडे बघून बोलले . राखामाने वर पहिले . कांदे चिरत असल्याने तिचे डोळे आधीच चुरचुरत होते . " हुं "ती म्हणाली . आणि तिने पदर सावरून घेतला . तिला देशपांडे हा माणूस फारसा आवडत नसावा असं  मला उगीचच वाटलं . बाकी सत्तुच्या मानाने रखमा बरीच तरुण अन तेज तरतरीत वाटली .
                                " देशपांडे साहेब , पाण्याची काय व्यवस्था आहे इथे ?" मी विचारले .
                                " बागेला नदीवरून भूमिगत पाईप  आणले होते , पण उन्हाळ्यात नदी कोरडी पडते . वाड्यात हौद आहेत काही अन बुरुजाखाली वाव आहे . चला  मी दाखवतो . हि वाव ! बारमाही पाणी असते हिला . पायऱ्या आहेत आत पर्यंत . हळूच …जरा निसरडी आहे . हिला आपलं  एक बकुळेची वाव असं नाव आहे."
                                      " बकुळा म्हणजे ती चित्रातली नं  ?" रोझीने विचारले .
                                      "हुं " देशपांडे म्हणाले . बकुळेचा  विषय निघाला कि हा बडबड्या माणूस एकदम मुका होतो हे माझ्या लक्षात आले होते .
                                   " पण का ? ती पाणी भरायची का या वावेतून ?" रोझीला बकुळेत खूपच इन्टरेष्ट  होता .
                                     " हुं " देशपांडे म्हणाले . मला काही ते पटलं  नाही .
                                  ती संध्याकाळ अशीच गढीची पाहणी करण्यात गेली . रात्री जेवणात सत्तू आणि रखामाने गावठी कोंबडी शिजवली होती . भरपेट जेवण करून मी माझ्या खोलीत विश्रांतीसाठी गेलो . वरच्या बाजूची हवेशीर खोलीत मी माझी व्यवस्था करायला लावली होती . गढी जरी दुमजली असला तरी जीन्या लगतच्या काही खोल्या जास्त मजल्याच्या होत्या .माझी खोली तिसर्या मजल्यावर होती आणि शेजारच्या एकमेव खोलीत मी रोझीची व्यवस्था करायला लावली होती . जेवणानंतर मी सवयीप्रमाणे स्कॉचचा एक छोटा पेग घेतला .माझ्या खोलीतून पूर्वेकडचा बुरुज आणि बकुळेची  वाव स्पष्ट दिसत होती .
                             स्कॉचचा दुसरा पेग रीचाविल्यानंतर मी रोझीला हाक माराली. दिवसभर घेतलेल्या नोंदी , उद्या करावयाची कामे यांचे डीटेल्स घेता घेता मी हळूच रोझीचा हात पकडला . तिने जरा अनिच्छेने मान वळविली पण विरोध मात्र केला नाही . तिला जवळ घेताच मला " बार्बेरी" या तिच्या आवडत्या परफ्युमचा सुगंध आला . या सुगंधाने माझे मन उत्तेजित झाले . आजची चांदणी रात्र या सुगंधातच न्हाऊन निघाली होती . पण जशीजशी रात्र रंगात येऊ लागली तसतसा ' बार्बेरी ' परफ्युमचा सुगंध कुठेतरी हरवून गेला आणि मला खस हिन्याचा पारंपारिक गंध येऊ लागला . रोझी तर असले जुनाट अत्तर कधीच वापरत नसे . पण मी त्याकडे दुर्लक्ष केले . पूर्वेकडच्या गवाक्षातून आलेल्या वाऱ्याच्या झुळकेने आमची अंगे शहारून गेली .
                               रात्री केव्हातरी अचानक मला जाग आली . आपल्या शेजारी एक नऊवारी पातळातली  बाई झोपली आहे असा मला भास झाला . मी वळून बघितले. माझ्याशेजारी रोझी नव्हती तर वेगळीच स्त्री होती . तिचा चेहरा मला ओळखीचा वाटला .   स्मृतीला थोडा ताण  दिल्यावर आठवले ; अरे बापरे , हि तर बकुळा !मी खुप घाबरलो . सर्वांगाला दरदरून घाम फुटला ." रोझी …" मी हाक मारली . "काय सर ? " रोझी दचकुन जागी होत म्हणाली . अरेच्चा हि तर रोझीच . मग बकुळा  कुठे गेली ?…
************
                         सकाळी रोझी केव्हा उठून गेली ते कळलेच नाही . जाग आली तेव्हा चांगलेच उजाडले होते . डोके किंचित दुखत होते . मला रात्रीची घटना आठवली . सकाळच्या लख्ख प्रकाशात मला रात्रीचा भास केवळ हास्यास्पद वाटत होता .'दोन पेग म्हणजे जरा जास्तच झाले.' मी स्वतःशी बोललो .
                           थोड्या वेळाने चहाचा ट्रे घेऊन सत्तू वर आला . चहा घेता घेता माझे लक्ष महिरपी गवाक्षातून बकुळेच्या वावेकडे गेले . मी सत्तुला विचारले , " काय सत्तूराव ? किती वर्षापासून या गढीत कामाला आहात ?"
" जी पोरवायापासून हीथच हाय जी . मपला बाप बी हिथच खपत व्हता . " सत्तू उत्तरला .
" मला सांग सत्तू ती समोर जी वाव दिसते आहे , तिला बकुळेची वाव का म्हणतात ?" मी विचारले .
"ती एक भल्ली स्टोरी हाय जी . " सत्तू एकदम खुललाच . " म्हातारा रावसाहेब रावभाद्दूर म्हंजी नादी माणूस. ह्याचा लई नाद व्हता ."  सत्तू डाव्या नाकपुडीवर तर्जनी आपटीत म्हणाला . "एक डाव बकुळा बटकीन त्याच्या मनात भरली . रातच्याला याच खोलीत कवाकवा बोलवून घ्यायचा . तिचा बिचारीचा जीव तीळतीळ तुटायचा पण रावभाद्दुरा म्होरं बोलायची कुणाची टाप न्हव्हती . एक डाव एक इंग्रज चित्रकार आला व्हता गढीत . समद्या बाप्यांच्या अन बायामान्सांच्या तसबिरी केल्या . रावभाद्दुरास काय लहर आली कायणु , बाकुळेचीबी एक तसबीर बनवून घेतली . ते थोरल्या बाईसाहेबांच्या मनाला लागलं . पुढं बकुळा गढीतून गायब झाली . आता कोन बोलतंय का तिनं वावेत जीव धीला , कोन बोलतंय थोरल्या बाईसाहेबांनी तिला तळघरात डांबून मारली अन वावेत फेकली पण तिची डेड बॉडी काय गावली नाय .  असं म्हणत्यात कि थोरल्या बाईस्नी बकुळा  रातच्या टायमाला झाड्याला जातानी  वावेच्या काठी बसलेली दिसायची . मग म्हणे  बाईसाहेबांस्नी एकदा द्रीष्टांत झाला आणि त्यांच्या सपनात बकुळा आली . म्हणाली ,'मी वावेतच हाये , मी काय अन तुम्ही काय! बाईचा जन्म म्हणजे गाळात  रुतून पडणं !' तवा बाईसाहेबांनी वावेवर साती आसरा पुजल्या अन अमोशा पौर्णिमेला बकुळेला निवड दावत्यात . तवापासून या वावेचं नाव बकुळेची वाव असं  पडलं . "
**************
                        तो दिवस अतिशय गडबडीत गेला . खूप कामे करायची होती . गढीची डागडुजी  लगेच सुरु करायची होती . बागेची साफसफाई आणि सगळ्या हौदांताला गाळ  काढण्याच्या कामाला प्राधान्य देणे गरजेचे होते . मी गढीत सर्वत्र हिंडत होतो. रोझी आवश्यक त्या सर्व नोट्स काढत होती . अनेक फोन कॉल्स करून कामाचे नियोजन केले जात होते. माझी उरलेली टीम उद्या येणार होती .
                        या सगळ्यात रोझी तिचे काम व्यवस्थित करत होती . मात्र तिच्यात नेहमीचा उत्साह दिसत नव्हता . ती कुठल्यातरी वेगळ्याच जगात आहे असे वाटत होते .
                         दुपारी जेवणानंतर मी जर वामकुक्षी घेत होतो . अचानक थंडगार वार्याच्या  झुळुकेने मला जाग आली . गवाक्षात जाऊन मी खाली बघू लागलो . बकुळेच्या वावेतलं हिरवगार शांत पाणी वरून दिसत होतं . अचानक पाण्यात कुणी तरी घागर बुडविल्याचा मला भास झाला . पाण्यात अचानक अनेक तरंग उठले आणि 'चुबुक' असा घागर भरल्याचा आवाज मी इतक्या दुरूनही स्पष्ट ऐकला . नंतर पायऱ्यांवर शिंतोडे उडताहेत, कोणीतरी ओलेती स्त्री आपला पदर पिळते आहे . त्याचे ओघळ पायऱ्यांवरून पुन्हा पाण्यात ओघळताहेत . असाही भास मला होऊ लागला . मी डोळे चोळू लागलो . दुपारच्या वेळी मला एकटे पाहून अचानक कवितादेवी माझ्यावर प्रसन्न झाली कि काय असे मला वाटून गेले. मी आपला दगड विटांत रमणारा एक रुक्ष व्यवहारी माणूस . पण हळूहळू समोरच्या दृश्याचा अंमल माझ्या मनावर पडतो आहे असे मला वाटू लागले . मी जणू मनाने त्या जुनाट सरंजामी काळात पुन्हा जाऊन पोहचलो . आता मी बांधकामाची कंत्राटे घेणारा , शेअर बाजारात पैसे लावणारा एक सामान्य बिल्डर नव्हतो . तर मी होतो वैभवशाली घरंदाज ,बंदुकीच्या एका गोळीत वाघाला लोळविणारा एक सरदार . आता मला दिसू लागले कि ती स्त्री आपल्या अपार्थिव पावलांनी हळूहळू पायऱ्या चढून वर येत आहे . भर दुपारची वेळ होती . उन्हाची तिरीप माझ्या डोळ्यांवर येत होती . मला क्षणभर भोवळ आल्यासारखे झाले . डोळ्यांपुढे  क्षणिक अंधारी आली .…  आणि ती मला स्पष्ट दिसली ! उदास … वावेत सगळ्यात वरच्या पायरीवर येउन बसलेली . घागर शेजारी ठेवलेली . हनुवटीवर काही गोंदलेले आहे . कासोटा खोचलेले लुगडे गुढघ्यापर्यंत वर घेतलेले आहे . थकून भागून पदर ढळून  जिचा उर धपापतो आहे . जिने हिरव्या रंगाची चोळी घातली आहे . अशी कोण हि मलूल होऊन वावेच्या काठी बसली आहे ? तीच ती ! शंकाच नको बकुळाच ती !
                 मी शहारलो . अंगावर शर्ट चढवून घाईघाईने जिना उतरून खाली आलो . भर उन्हात धावत वावेच्या दिशेने गेलो . हो , ती अजूनही तिथेच बसलेली होती . मृगजळासारखी उन्हात वितळून नाही गेली . पण हे काय ? हिची घागर कुठे गेली ? हिची नऊवारी साडी चोळी कुठे गेली ? माझ्या समोर जीन्स टी शर्ट मधील हि कोण भलतीच स्त्री बसलेली आहे ? ओह माय गॉड ! हि तर रोझी !!
                    " रोझी ? तू इथे काय करते आहेस ?" मी किंचाळून विचारताच रोझी जणू स्वप्नातून जागं व्हावं तशी दचकली . " क …. काही नाही सर . गढीत जीव गुदमरल्यासारखं वाटत होतं . असं वाटत होतं कि हि गढी कणाकणाने आपल्याला पचविते आहे . म्हणून इथे मोकळ्या  येउन बसले . " रोझी म्हणाली .जवळच्या पहाडावर रानतुळस ,पुदिना बदिशेपिचा दरवळत असलेला सुवास सारे आकाश भारून टाकीत होता .
************
त्यानंतर उरलेला दिवसही कामातच गेला . दुपारी जेवण जरा जास्तच झालं होतं . झोपेचा अंमल आणि अती खाणं यामुळे असले भलभलते भास होतात . रात्री त्यामुळे कमीच जेवलो . आज ड्रिंक्सही घेतले नाही . झोपण्यापूर्वी उद्याच्या कामाचे डीटेल्स रोझीला द्यावेत म्हणून तिला बोलावून घेतले . खरतरं एकटेपणाची अनामिक भीती मला छळत होती . रोझीच्या सोबतीने जरा बरं वाटलं . रात्री उशिरापर्यंत माझं डिक्टेशन चालू होतं . अचानक मी रोझीला म्हटलं ," रोझी ; आता खूप उशीर झालाय . जा आता तू तुझ्या खोलीत . "  रोझीला  खूप आश्चर्य वाटले. पण ती लगेच उठली . नोटपॅड व पेन घेऊन लगेच खाली गेली . आज पुन्हा काल सारखे  भास होतात कि काय या भीतीने लवकर झोप लागली नाही .
                               जाग आली तेव्हा दिवस चांगलाच वर आला होता . गवाक्षातून उन्ह आत येत होती . खाली कसलीशी गडबड ऐकू येत होती . गवाक्षात जाऊन बघितलं . वावेताला गाळ  काढण्याचं काम पहाटेच सुरु झालं होतं .पण काहीतरी गडबड वाटत होती . मी लगबगीने खाली उतरून गेलो . " काही नाही साहेब; हाडांचा सापळा सापडला गाळात . बाईचा  असावा . खूपच जुना वाटतोय . एखादी मोलकरीण पाणी भरता भरता पडली असावी जुन्या काळात कधी तरी वावेत . तिचा सापळा  असावा . काही काळजी करू नका . जाळून टाकायची व्यवस्था करतो . पोलिसांची काहीच अडचण नाही साहेब . ती चिंताच नको ." देशपांडे सांगत होते .
                                                      … त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोझीने नोकरीचा राजीनामा दिला .   .
             

Sunday 8 June 2014

मेटामॉरफॉसीस पुन्हा एकदा …… भाग १

                                                              एके दिवशी , सकाळी जेव्हा गजानन सरोदे नेहमीप्रमाणे अलार्मच्या आवजाने स्वप्नातून जागा झाला तेव्हा त्याच्या लक्षात आले कि  अलार्मचा आवाज त्याच्याच छातीतून  घऱघऱत येत होता  . त्याचे हात  पाय  त्याच्या शरीरालाच जखडले  होते . त्याने डोळे उघडले तेव्हा त्याचा चेहरा एकदम प्रकाशमान  झाला . त्याच्या असे लक्षात आले की तो एक पारदर्शक पडद्या आडून जगाकडे पाहत आहे . त्याचा चेहरा, छाती आणि पोट  यांचे  रूपांतर एका संवेदनशील 'टच स्क्रीन ' मध्ये झाले आहे . एका वायरी मधून त्याच्यामध्ये चैतन्य पुरवठा होत असून आता  पूर्णपणे  चार्ज झाल्यामुळे एकप्रकारची  तृप्तीची भावना त्याच्या शरीरातून वहत आहे  . परन्तु कोणी तरी स्विच ऑफ केले नाही  तर लवकरच अत्यधिक उष्णतेने आपले नुकसान होईल असा विचार त्याच्या मनात आला . मात्र वरिष्ठांच्या हुकुमशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही  ही सवय त्याला पुर्वी पासून  असल्याने त्याने कुठलीही हालचाल  केलि नाही .
                                                                    " च्युत मरीच्या , हे काय  होऊन  बसलय माझं !" गजा स्वतःशी म्हणाला . ( त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला बोलताना शिव्यांचा वापर करता येत नसे . त्यामुळे स्वतःशी  बोलताना तो नेहमी आपली शिवराळपणाची हौस भागवून घ्यायचा . ) हे स्वप्न असावे किंवा रात्रीची उतरली नसावी अशीही शंका  त्याला आली . पण ते स्वप्न नव्हते  .                                                                                                                 त्याच्या खोलीच्या छताचा तोच तो चिरपरिचित विटलेला  रंग , तोच आवाज करीत खड़खड़ फिरणारा पंखा . तीच त्याची विरलेली चादर आणि जागोजागी फुगलेली गादी  . छताकडे तोंड असल्याने त्याला भींती  व्यवस्थित दिसत नव्हत्या मात्र समोरच्या भिंतीवरील मासिकातून  कापलेले  कटरीना कैफचे शीतपेय पितांनाही लैगिक हावभाव करणारे चित्र त्याला अंधुक दिसत होते .
                                                                    त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून खिडकीकडे पाहिले . खिडकीच्या लोखंडी चौकटीतून पावसाचे तुरळक  थेम्ब  टपटपत होते . हवेत सुखद गरवा होता . "च्यमारी , झोपावं   थोड़ा वेळ अजुन . सगळाच मूर्खपणा . होऊन  जाऊ दे काय व्हायचे असेल ते!" गजा स्वतःशी  म्हणाला . पण त्याला एक कुशिवार झोपल्याशिवाय झोप येत नसे . आता तर त्याचा आकर चांगलाच
 पसरट आणि चपटा झाला होता . शिवाय त्याला स्वतःहून हलताही येईना .
"कायपण नौकरी आहे येडझवी. सारख फिरतीवर राहायचं . मिळेल ते खायचं  , दिवस भर ट्राफिकने  जीव नको नको होऊन जातो .  त्यात ती  गाड्यांची वेळापत्रकं सांभाळा  , सतरा जणांच्या अप्पोइंटमेंटि घ्या . रिमाइंडर लावा , सतत खिशात फोन वाजतोय ,नाहीतर मेसेज तरी येतोय , आता तर स्वतःच फोन झाल्यासारखं वाटतय . " गजा स्वतःशी करवदला.
थोडावेळ डोळे मिटून त्याने पुन्हा डोळे उघडले . " उठावंच लागेल भोसडीचं  आता . नायतर तो कल्लू मामा घोडा लावेल. (कल्लू मामा हे त्याचा बॉस श्रीयुत कुलकर्णी याचं लोकप्रिय खाजगी नाव होतं . ) " माणसाला झोप पाहिजे . सालं हे काय जगणं  आहे ? बाकीचे सेल्समन कसे आरामात जगतात . आमचा बॉस  आम्हाला कुत्र्यासारखं पळवतो . कस्टमर लोक बी आजकाल भल्या सकाळचीच अपोईन्टनट्स  देतात . च्यामारी एवढं कर्ज फिटू दे . गांडीवर लाथच मारतो त्या कल्ल्याच्या . " आपण बॉसच्या गांडीवर लाथ मारत आहोत असे चित्र मिटलेल्या डोळ्यांसमोर उभे करीत गजा  थोडावेळ स्वतःशीच हसत राहिला . आपण बॉसच्या तोंडावर राजीनामा फेकतो आहोत आणि बॉसचे तोंड म्हशीच्या ** सारखे झाले आहे असे स्वप्नरंजन तो करू लागला . " आय्घाला तासा  तासाला फोन करून रिपोर्ट घेतो . त्यात कानाने अधू . ओरडून ओरडून घसा फाटतो . अरे बापरे …आता मात्र उठायलाच पायजे . पाचची गाडी पकडायची आहे ."
                                                               त्याने स्वतः मधेच डोकावून वेळ बघितली . अरे बापरे ! हे काय ? साडे पाच वाजले . आता तर साडेचारचा अलार्म
 वाजला होता . पाच मिनिटे डोळे मिटले तेवढ्यात एक तास झाला ?
आता पुढची गाडी पावणे सहाला . म्हणजे मरणाची घाई करावी लागणार . चला , आवरू आता झटपट . पण हे काय ? त्याला कणभरही हलता येईना . फक्त डोक्यातून प्रकाश चालू बंद होतोय . नाहीतरी आता कितीही घाई केली तरी कल्लू चढायचं ते चढणारच . अजून पर्सल्स   प्याक करायचे आहेत . आणि डिलिवरी बॉयने पाचच्या गाडीची वाट पाहून पार्सल  न पोहोचल्याचा रिपोर्ट सुद्धा दिला असेल . सिक लिव्ह टाकावी का ? पण बॉस साला विश्वास  नाय ठेवणार . इन्शुरनस  कंपनीचा डॉक्टर घेऊन घरीच धडकायचा . आणि तो डॉक्टरही  साला , त्याला कोणी आजारी वाटतच नाही . 'काही धाड  भरलेली नाही' असा शेरा  ठोकून देईल . आणि आजच्या घडीला काय खोटं  आहे का ते ? मला तर उलट चार्ज झाल्यासारखं वाटतंय . हं , ब्याटरी  जरा  तापली आहे इतकंच  . पण त्या माणसाच्या डॉक्टरला ते काय कळणार ?
                                                   असा विचार करीत गजा कितीतरी वेळ पहुडला होता . इतक्यात त्याला दारावर  बांगड्या घातलेल्या  चिरपरिचित हाताची थाप ऐकू आली . " गजा  रे ? उठ बाळा आता . साडेसहा वाजलेत . कामावर नाही जायचं का तुला ?" काय त्या माउलीच्या आवाजात ओलावा होता ! गजा  उत्तर देताना जरा अडखळला . आवाज त्याचाच असला तरी फोन मधून यावा तसा विचित्र येत होता . " हं , उठतोय अक्का ." गजा  उत्तरला . त्याला पुढे बोलायचे होते पण प्राप्त परिस्थितीत अधिक बोलणे त्याला श्रेयस्कर वाटले नाही . लाकडी दरवाज्यातून त्याच्या आवाजातील मेटालिक झालर आईला कळली नसावी अशी त्याला आशा  होती . पण त्याच्या तुटक उत्तराने घरातील बाकीचे लोकही साशंक झाले . " गजा ; काय चाललंय  तुझं आत ?" गजाचा बाप करवदला  , थोडावेळ वाट पाहून पुन्हा काळजीने हाका मारू लागला . " गजा , अरे गजा भोसडीच्या सकाळी सकाळी फुल टाइट झाला कि  काय रे ?"गजाच्या खोलीला मागच्या बाजूनेही  एक दरवाजा होता . गजाची बहिण शारदा तो दरवाजा वाजवू लागली ," गजू दादा , बरं  वाटत नाही काय रे ?" ती काळजीने विचारू लागली . " उठतोय दोन मिनिटात ." आपल्या आवाजातील यांत्रिक कंप लक्षात येऊ नये म्हणून गजा हळू हळू एक एक शब्द उच्चारीत म्हणाला . हे ऐकून त्याचा बाप बिडी प्यायला निघून गेला . पण शारदाने काही गजाचा पिच्छा सोडला नाही . "गजु  दादा, दार  उघड बरं  आधी ." शारदा  विनवू लागली . गजाचा दार उघडायची अजिबात इच्छा  नव्हती  . प्रवासातील सवयीनुसार दोन्ही दारे त्याने आतून बंद करून घेतले होते ; याबद्दल त्याने मनातल्या मनात स्वतःलाच शाबासकी दिली .
                                                    पण आता  उठायलाच  पाहिजे . आता हळूहळू उठावे, अंथरुणातून बाहेर पडावे , कपडे बदलावेत , चहा  ढोसावा  आणि मग.... , त्याच्या स्क्रीन वर  आजच्या तारखेच्या अपोइंटमेंट्स हाइलाइट झाल्या . आता उठले म्हणजे हे चित्र विचित्र भास ही लगेच नाहीसे होतील . पण प्रत्यक्ष हालचाल केल्याशिवाय गोष्टी घडत नसतात आणि आपण स्वतःला हालचाल करण्याची कामांड  देऊनही काहीही
हालचाल करू शकत नाही हि गोष्ट त्याला लवकरच कळून चुकली .
'सोपं आहे , प्रथम अंगावरची चादर बाजूला करायची , नंतर पाय  उचलून अलगद जमिनीवर ठेवायचे , त्याचवेळेस डोके वर उचलून आधी पलंगावर उठून बसायचे , मग आळस झटकून उभे राहायचे .' त्याने स्वतःसाठी आज्ञावली तयार केली . पण त्यानुसार काहीच घडेना . त्याचे हात आणि पाय त्याच्या
चपट्या चौकोनी शरीरालाच जखडले गेले होते . त्याचे अंग चांगलेच तापले होते . कोणीतरी चार्जिंग वायर डिस्कनेक्ट करण्याची गरज होती . ' आजारामुळेच मनात असे भलते सलते विचार येतात . सततच्या प्रवासानेच माझा घसा बसलाय . म्हणून तर आवाज
असा फोनमधून आल्यासारखा येतोय . ' त्याने स्वतःची  समजूत घातली . ' पण म्हणून असे काहीच न करता झोपून राहणे बरे नाही '. त्याने स्वतःशी विचार केला आणि उठून बसण्याचा पुन्हा एकदा निकराने प्रयत्न केला .
  नेहमीप्रमाणे  उजव्या कुशी वरून उठता येत नसेल तर डाव्या कुशीवरून उठण्याचा एकदा प्रयत्न करू , म्हणजे मग भिंतीकडे तोंड होईल . नंतर १८० डिग्रीच्या कोनातून वळले कि पलंगावरून उतरता येईल . मग उजवीकडे वळून दरवाजा उघडायचा आठ फुट सरळ चालून पुन्हा उजवीकडे वळायचे म्हणजे स्वयंपाक घरात जाता येईल . त्याच्या स्क्रीनवर पटापट नेवीगेशन डाऊनलोड होऊ लागले . पण डाव्या कुशीवरही वळता येईना . मग काही वेळ तो स्वस्थ पडून राहिला . हळूच खिडकीकडे पहिले . सात वाजले असतील तरी पावसाळी हवेमुळे अजून पहाट असल्यासारखेच वाटते आहे . त्याच्या मेमरीत अचानक सविताचा फोटो तरळला . अशा वेळी खरे तर तिच्याबरोबर हातात हात घालून दूरच्या रानात फिरायला जाता आले असते तर काय बहार  आली असती . अचानक त्याच्या मेमरी कार्ड मधील सॉंग लिस्ट मधून ' तेरी दो टकीयोकी नोकरीमे मेरा लाखो का सावन जाये ' हे गाणे वाजू लागले . त्याने निकराने पॉज बटन दाबले . हा आवाज बाहेर गेला तर गोंधळ व्हायचा असा त्याने विचार केला . पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करून सुद्धा उठून बसणे काही त्याला जमेना . ' दोन तगडे माणसं  असते तर पुरले असते . अप्पांना बोलवावे आणि शेजारच्या बाळूकाकांना . ' त्याचा मनात कल्पना तरळली . आता साडेसात तर नक्कीच झाले असतील . ऑफीस उघडलेही असेल एव्हाना कल्लू खवळला असेल . असा विचार मनात यायला आणि काल्लूचा फोन यायला एकाच गाठ पडली . त्याच्या हृदयाची धडधड इतकी वाढली कि आपण व्हायब्रेटींग मोड वर आहोत कि काय अशीच शंका त्याला आली . फोन
रीसीव्ह करण्याचे धाडस काही त्याला झाले नाही . पूर्ण रिंग वाजून फोन बंद झाला . त्याच्या कपाळावर
 मिस कॉल चे चिन्ह उमटले . रिंग टोन बंद झाल्यावर मात्र आपण फोन उचलला असता तर बरे झाले असते असे त्याला वाटू लागले . काहीतरी थाप मारता आली असती . आता फोन न उचलल्यामुळे कल्लूला संशय येणार आणि तो थोड्याच वेळात घरी कोणालातरी पाठविणार . त्याच्या आत उठले पाहिजे आणि बाहेर पडले पाहिजे . अन्यथा सगळेच बिंग फुटेल . पण जोरदार  प्रयत्न करूनही त्याला इंचभरही सरकत येईना . मघाशी फोनच्या व्हयब्रेशन मुळे तो थोडाफार सरकला होता इतकेच . त्याला अचानक किंचाळावे असे वाटू लागले . कोणाला तरी मदतीला बोलवल्या शिवाय गत्यंतर नाही हेही त्याला आतून जाणवले . तरीही तो शांत राहिला . ' बी पोझीतीव्ह , बी काम .' त्याने ' हाऊ टू बी सक्सेसफुल ' या त्याच्या आवडत्या पुस्तकातील वाक्ये मनाशी म्हटली . आणीबाणीच्या परिस्थितीत तो नेहमीच या सूत्रांचे स्मरण करायचा . त्यानेही फरक पडला नाही तर सरळ 'भीमरूपी महारुद्र ' हे मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात करायचा . आताही त्याने तेच केले . पण दरवेळेस त्याची जी लागायची ती लागायचीच . याही वेळेस तेच झाले . त्याच्या घराची डोअर बेल वाजल्याचे त्याला ऐकू आले . ' नक्कीच ऑफिस मधले कोणीतरी आले असणार .' त्याने कानोसा घेतला . मिनिटभर कोणीच दरवाजा उघडला नाही . त्याला वेडी अशा वाटू लगलि. त्याच्या स्क्रीनवरील घड्याळातील सेकंदाचे दोन टिंब लुकलुकताना तो बारकाईने बघू लागला . पण अर्थातच एक दोन मिनिटातच नेहमीप्रमाणे त्याच्या बहिणीने दरवाजा उघडला . कोण आले आहे हे कळायला त्याला त्या व्यक्तीने उच्चारलेला एक शब्दच पुरेसा होता . हा काल्लूचा चमचा जोशा होता . जोशा त्याचा सिनियर होता आणि गजावर नेहमी खार  खाऊन असे. च्यामारी , एकदिवस जरा उशीर काय झाला , हे लगेच पंचामामा करायला आले . जसे काय यांचे स्यम्पल चे पार्सल आणि पैसे घेऊन पळूनच जाणार आहे . आले लगेच घरच्या माणसांसमोर उद्धार करायला . बाकीचे सारे जसे साव आणि मीच काय तो चोर ! एखाद्या शिपायाला पाठवायचे लईच अडचण असेल तर . जोशा मुद्दाम आला बापासमोर माझी लाज काढायला . म्हणजे आम्ही फार मोठा गुन्हा केलाय आणि हे आले आता फौजदार .
माझ्यावर आज जो प्रसंग गुदार्लाय तो जर जोशावर नायतर काल्लूवर  गुदरला असता तर उलट त्यांनी त्याचाही भांडवल केलं असतं . म्हणजे बघा आम्ही कशा कंपनीसाठी
 खस्ता खातोय …. हळूहळू जोशाच्या बुटांचा आवाज जवळ येऊ लागला . पाठीमागच्या खोलीतून बहिण शारदा हलक्या आवाजात कुजबुजली . " दादा , जोशी साहेब अलेत. " " माहित आहे मला ." गजा  हळू आवाजात उत्तरला . एवढ्या हळू आवाजात कि तो पलीकडच्या खोलीत शारदाला ऐकूही गेला नसणार . इतक्यात त्याच्या वडिलांनी पुढचे दार  वाजविले. "गजा, अरे गजा .जोशी  साहेब आलेत बघ , त्यांना बोलायचं तुझ्याशी . तू आज महत्वाची ऑर्डर मिस केली म्हणे , आम्ही काय सांगणार यावर म्हणा , दर उघड आणि तूच बोल " वडील दारावर थाप मारत असता आई  मात्र जोशाला म्हणत होती ," आजारी आहे हो पोर . नाहीतर असं  व्हायचं नाही . कायम बिझनेसचा विचार डोक्यात . पहाटेच उठून फिरती वर जातो . उलट मीच रागावते त्याला कधी कधी . पण तो म्हणतो , कंपनीचा फायदा झाला पाहिजे . खाल्ल्या मिठाला जगलं पाहिजे . " यावर जोशा साळसूदपणे म्हणत होता ,"मलाही तेच वाटतंय . आजारी असल्याशिवाय सरोदे असे करायचे नाहीत . म्हणून तर काळजीने मी स्वतः आलो . सरोदे , अहो दर उघडतंय ना ? मला जर खाजगी बोलायचंय  ." मी आत उठण्याचा प्रयत्न करीत होतो . पण  जमेचना . तसाच झोपल्या झोपल्या उत्तरलो ," जोशी साहेब , मी उठतोच आहे थोड्या वेळात . खरे म्हणजे मी अजून अंथरुणातच आहे आणि उठण्याच्या प्रक्रियेच्या ऐन मध्यावर आहे . मला माहित आहे कि असे वागणे माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित नसेल . पण कधीकधी माणसाला असे क्षणिक झटके येतात क्वचित . याचा अर्थ तो माणूस आळशी आहे असा होत नाही . उलट हीच वेळ असते त्याला समजून घेण्याची . त्याने यापूर्वी केलेली सेवा विशेषतः अशाच वेळी विचारात घ्यावी . माणूस म्हणजे यंत्र नसते हो . पण कधीकधी माणसाचाही अक्षरशः मोबाईल फोन होऊ शकतो हि शक्यता आपण विचारातच घेत नाही . तेव्हा तुम्ही थोडावेळ अप्पांबरोबर गप्पा मारत बसा . मी बघतो उठता येतं कि नाही ते . " मी असा बोलत असताना मागच्या खोलीतून शारदा  चक्क हुंदके देत रडायलाच लागली . यात रडण्यासारखे काय होतं ? कमाल आहे या बाईची . आता तिचं लग्न होत नाही म्हणून हिला कधीही रडू येतं . आजारी पडलं म्हणून काही मला लगेच नोकरीवरून काढून थोडेच टाकणार  आहेत ?
जोशा मात्र उसळलाच ," ऐकलंत सरोदे काय म्हणताहेत ते ? एक शब्द तरी कळला का ? आणि वर सांगताहेत कि अजून अंथरुणातच लोळत
पडले आहेत . मला गप्पा मारीत बस म्हणतात . " जोशा संतापाने अप्पान्शीच तावातावाने बोलू लागला .
" शांत व्हा जोशीसाहेब , बहुदा तापात बरळतोय गजा . मी आता माणूस बोलावून दर्वाज्च्या बिजागीर्याच तोडतो ." असे म्हणून अप्पा शेजारच्या बाळूकाकांना स्क्रू ड्रायवर आणि हातोडा घेऊन बोलावू लागले . शारदाही डॉक्टरांना बोलाविण्यासाठी बाहेर निघून गेली .मी गुपचूप काय होतं आहे त्याची वाट बघत पडून राहिलो .  थोड्यावेळात आडदांड बाळूकाका त्यांचे हत्यारे घेऊन आले . असले  कामं  करण्यात  त्यांना भलताच उत्साह वाटायचा . दरवाजाच्या बिजागीर्या खोलण्याचा आवाज येऊ लागला . बिजागीर्या सुट्या झाल्यावर त्यांनी  अप्पांच्या मदतीने दरवाजा हळूहळू दूर केला . समोर मी पलंगावर पडलेलो होतो . मला बघून अप्पा आणि बाळूकाकांची बोबडीच वळाली .
" अप्पा काय झालं तुम्हाला ?तुम्ही घाबरू नका . लगेच काही माझी नोकरी जात नाही . तुम्ही आणि बाळूकाका मला आधार देऊन हळूहळू उभे करा पाहू . मग मी बोलतो जोशी साहेबांशी . काय आहे या गर्मीने माझे हात पाय अंगालाच चिकटले आहेत . " मी म्हणालो . जोशा तर मला बघून उडालाच . लगेच रामरक्षा  स्तोत्र पूटपुटु  लागला . अचानक वळून दरवाजाच्या दिशेने पाळला  . त्याला जाऊ देणे योग्य नव्हते . माझी बाजू ऐकून न घेता जर तो गेला असता तर त्याने नक्कीच एकाचे दोन करून कल्लुचे कान भरले असते . या जोशाला बायकांचा भारी नाद . आता शारदा असती तर बरं  झालं  असतं . बरोबर पाघळला असता गडी . तिने बरोबर पटविले असते त्याला . " जोशी साहेब , अहो जरा  थांबा तरी " मी जोशाला हाका मारू लागलो . जोशा काही थांबला नाही . भूत बघितल्यासारखा धूम पळाला . इतक्यात माझे लक्श आई कडे गेले . ती चहाचा ट्रे  घेऊन आत येत होती . मला पाहून किंचाळलीच . तिच्या हातातला चहाचा ट्रे खाली पडला . कप फुटले आणि चहाचा ओघळ पलंगापर्यंत आला . उघड्या दरवाजाच्या समोरच्या गोदरेजच्या कपाटाच्या आरशात मला माझे नवे रूप दिसले . माझे रुपांतर पूर्णपणे एका महाकाय मोबाईल फोन मध्ये झाले होते . ठीक आहे न मग ! चांगलेच आहे कि ! त्यात एवढे मनाला लाऊन घेण्यासारखे काय होते ? ………. क्रमशः
                      

Wednesday 21 May 2014

हे अश्रू ….


हे अश्रू ….
कदाचित खरे असतीलही …
मात्र तरीही विसरता येत नाहीत
(विसरावं म्हणतो आताशा )
ते अश्रू …
जेव्हा तुमच्या रथचक्रातून
उडाल्या होत्या ठिणग्या ,
ज्यांनी खाक केला होता
हजारो वर्षांचा विस्वास , जिव्हाळा
तुमच्या राजपथावरील यात्रेत चिरडले गेले होते कित्येक कष्टकरी जीव
बेघर , भणंग
बहुजन युवकांची भडकली होती माथी
शांतीधर्माच्या अनुयायांनी
पेटविली होती रेल्वे
आणि मर्यादा पुरुषोत्तमाच्या मुलांनी
चिरले होते गर्भवती मातेचे पोट
जेव्हा
जिवलग मित्रांमध्ये
दाटून आले होते मळभ
आणि फुंकला गेला होता पांचजन्य
आपल्याच चुलत भावंडानविरुध्द
तेव्हा
एक 'हिन्स्र' नाटककार
उच्चारून गेला होता शापवाणी ….
"माझ्याकडे बंदूक असती तर मी एकाच व्यक्तीला मारले असते ……"
हि वांझ शापवाणी उच्चारताना
त्याच्या डोळ्यात तरळलेले
ते अश्रू .....