Thursday, 18 September 2014

                                               बकुळेची वाव 

                                                                         डॉ. अमित शिंदे 

"प्लीज़ सर, मला  खरंच  नाही जमणार यायला; स्वीटीची एक्झाम आहे आणि तिच्याकडे बघायला घरी कोणीच नाही. "
रोझी ; माझी पर्सनल सेक्रेटरी मला कळवळून विनवत होती . मी तिच्याकडे रोखून बघितले आणि म्हणालो ,
" हे बघ रोझी ;नीट विचार कर; तुझं प्रमोशन ड्यू  आहे आणि ते सगळं माझ्या हातात आहे . तुला गरजही  आहे पैशाची . तेव्हा नकार देण्याआधी विचार कर."
 लहान वयात घरच्यांच्या विरोधात लग्न करून फसलेली , आणि ऐन बवीशीत एका शाळकरी मुलीची आई असलेली रोझी एकटीच राहत होती .
                                        आणि मी असं  सावज हातचं जाऊ देणार नव्हतो!
                                         रोझी माझ्याकडे जॉईन होऊन काही महिनेच झाले होते . तिचे काम चोख होते आणि वागणे बोलणे चटपटीत . टापटीप राहण्याची तिला आवड होती . पण प्रमोशन मिळण्यासाठी तेवढे  पुरेसे नसते हे तिला अजून कळायचे होते .
                                          सातारा हायवेपासून जवळच  , महाबळेश्वरच्या जरा अलीकडे सरदार खाजगीवाले यांची पुरातन गढी  होती . या गढीचे रुपांतर फाईव स्टार रिसोर्ट मध्ये करण्याची त्यांच्या नातवाची इच्छा होती . त्यादृष्टीने तिथे तीन दिवस राहून , गढीची निट  पहाणी  करून प्राथमिक डागडूजीला लगेच सुरुवात करावी या उद्देशाने मी तिथे निघालो होतो . मागच्या एक दोन साईट व्हिजिटला रोझी माझ्या सोबतच असायची . तेव्हाच मी तिची चाचपणी करून ठेवली होती . डिक्टेशन देण्याच्या निमित्ताने ओझरता स्पर्श आणि सूचक बोलणे यांतून माझा हेतू तिच्यापर्यंत पोहचविला होता आणि तिचा पूर्ण अंदाज घेऊन ठेवला होता . त्यामुळेच यावेळेस माझ्यासोबत यायची रोझीची तयारी नव्हती .पण तिच्यासमोर दुसरा पर्याय तरी कुठे होता ? अननुभवी मुलीला कोण नोकरी देतंय ? आणि तेही आमच्यासारख्या नामांकित ग्रुप मधून हाकललेल्या !!
************
                                         आमची स्कॉर्पियो साईटवर पोहचली तेव्हा संध्याकाळ होत आली होती . गढी  गावापासून काही अंतरावर होती . गढीसमोर   भलंमोठं मोकळं मैदान होतं . निर्जन पहाडाच्या पायथ्याशी हि जुनाट गढी  एकटीच उभी होती . जवळपास मनुष्यवस्ती फारशी नव्हती आणि गावठाण जणू गढीच्या धाकाने अदबीने दूर वसले होते . जंगलावरून येणाऱ्या थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर हलका शहारा आणीत होती .  आमची गाडी थांबली आणि घरट्याकडे परतणारा सायंकालीन पक्ष्यांचा थवा  आमच्या डोक्यावरून किलबिल करीत उडत गेला . गढीकडे  बघताच  माझी तबियत खुश होऊन गेली . पण इतक्या शांततेची सवय नसल्यामुळे म्हणा किंवा या ओसाड दगडी गढीच्या निर्जनपणामुळे म्हणा रोझीच्या मनावर एकप्रकारचा दबाव आल्यासारखे वाटत होते .
                                          खाजगीवाले यांचा नातू सध्या यु. एस . मध्ये असतो आणि गढीची व्यवस्था देशपांडे नावाचे गृहस्थ बघत असत . आमची गाडी पोहोचताच ते लगबगीने सामोरे आले . हिरव्यागार कुरणात गाडी पार्क करून आणि गढीची तटबंदी ओलांडून आम्ही आत आलो . तटाला अजस्र सागवानी दरवाजा होता . त्याला लोखंडी खिळे  बसविलेले होते . आतून भलामोठा लाकडी अडसर लावलेला होता . दिंडी दरवाज्यातून आम्ही आत गेलो .आत पहारेकऱ्याची देवडी आणि नगारखाना होता . समोर मुख्य वाड्याभोवती नीट निगा न राखलेली बाग होती .  देशपांड्यांचा स्वभाव चांगलाच गप्पिष्ट असावा . हे सरदारांचे पिढीजात मुनीम . गढीचे कौतुक किती करू आणि किती नाही असे त्यांना होऊन गेले होते . त्यांची बडबड ऐकत आम्ही गढी बघू लागलो . तटाच्या आत केळी , पेरू आणि आवळ्याची कितीतरी झाडे लावून बाग तयार केलेली होती . ' या बागेला भूमिगत खापरी नळांतून नदीचे पाणी दिलेले आहेत . इथे पूर्वी कारंजी उडत असत . काय थाट सांगावा त्यावेळचा ! अहो आमचे रावबहाद्दूर रावसाहेब खाजगीवाले म्हणजे रसिक माणूस . एकदा बालगंधर्व स्वतः आले होते इथं , तेव्हा हा हौद गुलाबपाण्याने काठोकाठ भरून फवारे उडविले होते म्हणतात . गेले ते दिवस ! आता हि कारंजी उडत नाहीत . ती गाणी ऐकू येत नाहीत आणि तसल्या तुपाचे ओघळ वाहणाऱ्या पंगती झडत नाहीत . अहो एव्हडी मोठी बाग सांभाळायला माळी सुद्धा मिळत नाही आजकाल.  आमचा जुना सत्तू गडी आहे म्हणून आपलं चाललंय कसं  तरी . आता हे ठिकाण म्हणजे माझ्यासारख्या सडाफटिंग कारकुनाचे भलेमोठे पण भकास असे निवास्थान मात्र बनले आहे . ह्या ह्या ह्या !' देशपांडे स्वतःच्या विनोदावर हसत होते .
                                     बाग ओलांडून आम्ही वाड्याच्या ओसरीवर गेलो . तिथे वेताच्या खुर्च्या टाकून चहापाण्याची व्यवस्था केलेली होती . चहा घेताघेता मी देशपांड्यांची रोझीशी ओळख करून दिली , " हि माझी सेक्रेटरी कम असिस्टंट रोझी , हीदेखील दोन दिवस माझ्याबरोबरच इथे राहणार आहे ."
" अरे वा वा ! निस्संकोच राहा . सत्तू , अरे सत्तू जा बाबा रखमाला सांग; म्याडमची व्यवस्था नीट  कर म्हणून .तुम्ही काही काळजी करू नका रोझी म्याडम . आमची रखमा आहे तुम्हाला हवं नको ते बघायला . रखमा म्हणजे या सत्तूची बायको हो! " देशपांडे म्हणाले .
"चांगलं आहे . का हो देशपांडे , किती जुनी असावी हि गढी ?"मी विचारले .
" अहो जुनी म्हणजे काय ? म्हटलं तर मलिकंबरच्या जमान्यातली .पण धाकल्या बाजीरावाच्या दरबारात होते सरदार अप्पासाहेब खाजगीवाले. म्हणजे रावसाहेबांचे आजोबा . म्हणजे आमच्या साहेबांचे खापर पणजोबा म्हणाना ! अप्पासाहेब म्हणजे रावबाजीच्या खास  मर्जीतले सरदार . हे समोरचे बुरुज , घोड्यांच्या पागा  आणि हि तटबंदी त्यांनी बांधून घेतली . वरच्या काही खोल्या आणि मागची वाव मात्र रावसाहेबांनी बांधली . रावसाहेब म्हणजे साहेबांचे आजोबा हो ! चला, दाखवितो तुम्हाला ." देशपांडे उत्साहात म्हणाले .
                                          चहापाणी आटोपताच वेळ न दवडता आम्ही गढी  निरखू लागलो . ओसरीतून आत जाण्यासाठी पुन्हा एक सागवानी दरवाजा होता . याला पितळी चकत्या लावलेल्या होत्या . आत ऐसपैस चौक होता . " असे एकूण चार चौक आहेत वाड्याला " देशपांडे सांगत होते . समोरच बैठकीवर तक्के , लोड, गाद्या गिरद्या अंथरलेल्या होत्या . डाव्या  ओवरीत  कारकुनाचा फड आणि उजवीकडे देवघर होते . त्याला लाकडी जाळी बसवलेली होती. सगळीकडे ट्युबलाईट बसविलेल्या असल्या तरी जुन्या मशाली अजून तशाच अडकविलेल्या होत्या . आत गेल्यावर माडीवर जाण्यासाठी अंधारा चिंचोळा जिना होता . जिन्याजवळ धान्याची कोठारे आणि माजघर होतं . जिना चढतानाच चढणार्याच्या मनात धसका बसविणारा तळघरात उतरणारा जिना दिसतो . जवळच  भिंतीवर एक असूड  टांगलेला ! आत भिंतींना पुरुषभर उंचीवर ठोकलेल्या लोखंडी कड्या ! तळघर पाहून दडपलेली छाती जिन्याची उभी चढण चढताना अधिकच धपापून जात होती . सदरेवर बोलावलेल्या गरीब कुनब्यांची आधीच भीतीने गाळण उडावी म्हणून मुद्दाम अशी व्यवस्था केलेली असावी .
                वरच्या बाजूला मोठी सदर होती .  भिंतीवर ढाल तलवारी अडकविलेल्या होत्या . अनेक पूर्वजांची  मोठाली तैलचित्रे तिथे लावलेली होती .त्या तैलचित्रातले झुबकेदार मिशावाले पुरुष आणि सोन्याच्या दागिन्यांनी वाकलेल्या भरजरी साडीतल्या खानदानी स्त्रिया जुन्या वैभवाची साक्ष देत होत्या . अनेक महिरपी गावाक्षांनी हा भाग हवेशीर ठेवला होता ." काय दरारा होता रावसाहेबांचा ! गढीवर नुसतं  बोलावलं तरी पंचक्रोशीतील लोकांची भीतीने नुसती गाळण उडायची . हा उभा जिना चढून वर आलं कि समोरच रावसाहेब या बैठकीवर नाहीतर या इथं झोपाळ्यावर सुपारी कात्रीत बसलेले दिसत . काय रुबाबदार मूर्ती ! हि बघा त्यांची तसबीर ." देशपांडे भक्तिभावाने सांगत होते .
             चित्रात खरोखर एक धिप्पाड शरीराचा आणि करारी चेहऱ्याचा पुरुष हातात चांदीची मुठ असलेली छडी घेऊन उभा होता . लांब अंगरखा त्यावर किनखापी कलाबुताच नक्षीकाम ; छातीवर इंग्रज सरकारने दिलेल्या पदकांची रांग; सोनेरी वर्ख दिलेल्या एकसारख्या वीसएक गुंड्या ; खांद्यावर झिरमिळ्या ; काल्लेदार मिशा ; कोशाचा फेटा त्यावर मोत्यांची लड ; पायात चढाव आणि सगळ्यात वरतान  म्हणजे रोखून पाहणारे करारी डोळे . तसबिरीतून थेट आपल्या मनात डोकावताहेत असे वाटणारे.
                    "रावसाहेब म्हणजे एक दिलदार माणूस .जुन्या पिढीतले गावकरी अजूनही त्यांच्या आठवणी सांगतात .इग्रज सरकारने रावबहाद्दूर पदवी दिली होती त्यांना .  हजारो एकर जमीन . नाटकाचे मोठे शौकीन . शिकारीचा तर भयंकर नाद . बंदुकीचा नेम कधी चुकला नाही . हा पहा शिकारखाना . हा वाघ बघा . गावातली साताठ माणसं मारली होती त्याने . शेवटी रावसाहेब बहाद्दूर गेले मागावर . बरोबर रान उठविणारे हल्कारे . संध्याकाळच्या वेळेस नदीवर आला होता पाणी प्यायला .  रावबाहाद्दुरांनी एका गोळीत लोळवला . हि पहा गालाजवळ गोळीची खुण . ओहो एकदातर गम्मतच झाली . माल्कम साहेब म्हणून होता एक कलेक्टर शिकारीचा शौकीन . असेच रावसाहेब रावबहाद्दूर त्याच्यासोबत शिकारीला गेले होते . कोठूनसे एक रानडुक्कर आले थेट सहबावर धावून . साहेबाची हि गाळण उडाली म्हणता ; अहो भंबेरीच म्हणाना . पण आमचे रावसाहेब कसले खंबीर . बरची होती बरोबर ती नेम धरून अशी फेकली म्हणता …. डुक्कर जागेवर खलास ! अहो साहेबाला कळलच नाही मिनिटभर ! …. " देशपांडेंची रसवंती चांगलीच रंगात आली होती . त्यांचे किस्से ऐकत आणि छतावरची झुंबरे निरखत आम्ही ऐने महालात आलो . तिथं  वेगवेगळे  नक्षीदार आरसे , श्रीकृष्णाच्या रासलीलांचे रविवर्म्याची चित्रे , छपरी पलंग असा सगळा थाट होता . जुना ग्रामोफोन बंद पडलेला होता . सोबत बालगंधर्वांच्या अनेक तबकड्या होत्या. माझे लक्ष भिंतीवरच्या एका चित्राकडे गेले . चित्रात एक तरुण स्र्त्री  नउवारी पातळात दिसत होती . हि स्त्री इतर खानदानी  बायकांहून वेगळीच वाटत होती . तिच्या चेहेर्यावर गर्वोन्नत घरंदाज भाव नव्हते पण एक निराळाच गोडवा होता . अंगावरचे कपडेही फारसे उंची नव्हते . चित्राखाली बकुळा असे लिहिलेले होते .
                           " हि कोण ? " रोझीने  मधेच विचारले . ग्रामोफोनच्या तबकड्या दाखविण्यात मग्न असलेले देशपांडे अचानक थबकले . त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले . " हि बकुळा: या गढीत बटकी होती . " ते म्हणाले . बटकी म्हणजे मोलकरीण  नं ? मोलकरीणीचे चित्र कोणी काढले ? " तिने पुन्हा विचारले . देशपांड्यांना याचे उत्तर द्यायचे नव्हते. त्यांनी विषय बदलला . मग तिनेही अधिक विचारले नाही . पण बकुळेचे निरागस डोळे  नंतरही कितीतरी वेळ माझ्या मनातून जात नव्हते .
                                        त्यानंतर आम्ही गढीचा जिना उतरून मागच्या बाजूच्या चौकात आलो . इथे स्वयंपाकघर आणि हौद होते . चौकात तुळशी वृंदावन होते . " हा सत्तु  आणि हि त्याची बायको रखमा . " देशपांड्यांनी तिथे भल्यामोठ्या चुलखण्डावर  पातेले चढवत असणाऱ्या मध्यमवयीन  माणसाकडे निर्देश केला . त्याची बायको रखमा आमच्या रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करीत होती . " रखमा ! आता दोन दिवस ताईसाहेबांची जबाबदारी तुझ्यावर  !" देशपांडे खाली मान घालून कांदे चिरत असलेल्या राखामाकडे बघून बोलले . राखामाने वर पहिले . कांदे चिरत असल्याने तिचे डोळे आधीच चुरचुरत होते . " हुं "ती म्हणाली . आणि तिने पदर सावरून घेतला . तिला देशपांडे हा माणूस फारसा आवडत नसावा असं  मला उगीचच वाटलं . बाकी सत्तुच्या मानाने रखमा बरीच तरुण अन तेज तरतरीत वाटली .
                                " देशपांडे साहेब , पाण्याची काय व्यवस्था आहे इथे ?" मी विचारले .
                                " बागेला नदीवरून भूमिगत पाईप  आणले होते , पण उन्हाळ्यात नदी कोरडी पडते . वाड्यात हौद आहेत काही अन बुरुजाखाली वाव आहे . चला  मी दाखवतो . हि वाव ! बारमाही पाणी असते हिला . पायऱ्या आहेत आत पर्यंत . हळूच …जरा निसरडी आहे . हिला आपलं  एक बकुळेची वाव असं नाव आहे."
                                      " बकुळा म्हणजे ती चित्रातली नं  ?" रोझीने विचारले .
                                      "हुं " देशपांडे म्हणाले . बकुळेचा  विषय निघाला कि हा बडबड्या माणूस एकदम मुका होतो हे माझ्या लक्षात आले होते .
                                   " पण का ? ती पाणी भरायची का या वावेतून ?" रोझीला बकुळेत खूपच इन्टरेष्ट  होता .
                                     " हुं " देशपांडे म्हणाले . मला काही ते पटलं  नाही .
                                  ती संध्याकाळ अशीच गढीची पाहणी करण्यात गेली . रात्री जेवणात सत्तू आणि रखामाने गावठी कोंबडी शिजवली होती . भरपेट जेवण करून मी माझ्या खोलीत विश्रांतीसाठी गेलो . वरच्या बाजूची हवेशीर खोलीत मी माझी व्यवस्था करायला लावली होती . गढी जरी दुमजली असला तरी जीन्या लगतच्या काही खोल्या जास्त मजल्याच्या होत्या .माझी खोली तिसर्या मजल्यावर होती आणि शेजारच्या एकमेव खोलीत मी रोझीची व्यवस्था करायला लावली होती . जेवणानंतर मी सवयीप्रमाणे स्कॉचचा एक छोटा पेग घेतला .माझ्या खोलीतून पूर्वेकडचा बुरुज आणि बकुळेची  वाव स्पष्ट दिसत होती .
                             स्कॉचचा दुसरा पेग रीचाविल्यानंतर मी रोझीला हाक माराली. दिवसभर घेतलेल्या नोंदी , उद्या करावयाची कामे यांचे डीटेल्स घेता घेता मी हळूच रोझीचा हात पकडला . तिने जरा अनिच्छेने मान वळविली पण विरोध मात्र केला नाही . तिला जवळ घेताच मला " बार्बेरी" या तिच्या आवडत्या परफ्युमचा सुगंध आला . या सुगंधाने माझे मन उत्तेजित झाले . आजची चांदणी रात्र या सुगंधातच न्हाऊन निघाली होती . पण जशीजशी रात्र रंगात येऊ लागली तसतसा ' बार्बेरी ' परफ्युमचा सुगंध कुठेतरी हरवून गेला आणि मला खस हिन्याचा पारंपारिक गंध येऊ लागला . रोझी तर असले जुनाट अत्तर कधीच वापरत नसे . पण मी त्याकडे दुर्लक्ष केले . पूर्वेकडच्या गवाक्षातून आलेल्या वाऱ्याच्या झुळकेने आमची अंगे शहारून गेली .
                               रात्री केव्हातरी अचानक मला जाग आली . आपल्या शेजारी एक नऊवारी पातळातली  बाई झोपली आहे असा मला भास झाला . मी वळून बघितले. माझ्याशेजारी रोझी नव्हती तर वेगळीच स्त्री होती . तिचा चेहरा मला ओळखीचा वाटला .   स्मृतीला थोडा ताण  दिल्यावर आठवले ; अरे बापरे , हि तर बकुळा !मी खुप घाबरलो . सर्वांगाला दरदरून घाम फुटला ." रोझी …" मी हाक मारली . "काय सर ? " रोझी दचकुन जागी होत म्हणाली . अरेच्चा हि तर रोझीच . मग बकुळा  कुठे गेली ?…
************
                         सकाळी रोझी केव्हा उठून गेली ते कळलेच नाही . जाग आली तेव्हा चांगलेच उजाडले होते . डोके किंचित दुखत होते . मला रात्रीची घटना आठवली . सकाळच्या लख्ख प्रकाशात मला रात्रीचा भास केवळ हास्यास्पद वाटत होता .'दोन पेग म्हणजे जरा जास्तच झाले.' मी स्वतःशी बोललो .
                           थोड्या वेळाने चहाचा ट्रे घेऊन सत्तू वर आला . चहा घेता घेता माझे लक्ष महिरपी गवाक्षातून बकुळेच्या वावेकडे गेले . मी सत्तुला विचारले , " काय सत्तूराव ? किती वर्षापासून या गढीत कामाला आहात ?"
" जी पोरवायापासून हीथच हाय जी . मपला बाप बी हिथच खपत व्हता . " सत्तू उत्तरला .
" मला सांग सत्तू ती समोर जी वाव दिसते आहे , तिला बकुळेची वाव का म्हणतात ?" मी विचारले .
"ती एक भल्ली स्टोरी हाय जी . " सत्तू एकदम खुललाच . " म्हातारा रावसाहेब रावभाद्दूर म्हंजी नादी माणूस. ह्याचा लई नाद व्हता ."  सत्तू डाव्या नाकपुडीवर तर्जनी आपटीत म्हणाला . "एक डाव बकुळा बटकीन त्याच्या मनात भरली . रातच्याला याच खोलीत कवाकवा बोलवून घ्यायचा . तिचा बिचारीचा जीव तीळतीळ तुटायचा पण रावभाद्दुरा म्होरं बोलायची कुणाची टाप न्हव्हती . एक डाव एक इंग्रज चित्रकार आला व्हता गढीत . समद्या बाप्यांच्या अन बायामान्सांच्या तसबिरी केल्या . रावभाद्दुरास काय लहर आली कायणु , बाकुळेचीबी एक तसबीर बनवून घेतली . ते थोरल्या बाईसाहेबांच्या मनाला लागलं . पुढं बकुळा गढीतून गायब झाली . आता कोन बोलतंय का तिनं वावेत जीव धीला , कोन बोलतंय थोरल्या बाईसाहेबांनी तिला तळघरात डांबून मारली अन वावेत फेकली पण तिची डेड बॉडी काय गावली नाय .  असं म्हणत्यात कि थोरल्या बाईस्नी बकुळा  रातच्या टायमाला झाड्याला जातानी  वावेच्या काठी बसलेली दिसायची . मग म्हणे  बाईसाहेबांस्नी एकदा द्रीष्टांत झाला आणि त्यांच्या सपनात बकुळा आली . म्हणाली ,'मी वावेतच हाये , मी काय अन तुम्ही काय! बाईचा जन्म म्हणजे गाळात  रुतून पडणं !' तवा बाईसाहेबांनी वावेवर साती आसरा पुजल्या अन अमोशा पौर्णिमेला बकुळेला निवड दावत्यात . तवापासून या वावेचं नाव बकुळेची वाव असं  पडलं . "
**************
                        तो दिवस अतिशय गडबडीत गेला . खूप कामे करायची होती . गढीची डागडुजी  लगेच सुरु करायची होती . बागेची साफसफाई आणि सगळ्या हौदांताला गाळ  काढण्याच्या कामाला प्राधान्य देणे गरजेचे होते . मी गढीत सर्वत्र हिंडत होतो. रोझी आवश्यक त्या सर्व नोट्स काढत होती . अनेक फोन कॉल्स करून कामाचे नियोजन केले जात होते. माझी उरलेली टीम उद्या येणार होती .
                        या सगळ्यात रोझी तिचे काम व्यवस्थित करत होती . मात्र तिच्यात नेहमीचा उत्साह दिसत नव्हता . ती कुठल्यातरी वेगळ्याच जगात आहे असे वाटत होते .
                         दुपारी जेवणानंतर मी जर वामकुक्षी घेत होतो . अचानक थंडगार वार्याच्या  झुळुकेने मला जाग आली . गवाक्षात जाऊन मी खाली बघू लागलो . बकुळेच्या वावेतलं हिरवगार शांत पाणी वरून दिसत होतं . अचानक पाण्यात कुणी तरी घागर बुडविल्याचा मला भास झाला . पाण्यात अचानक अनेक तरंग उठले आणि 'चुबुक' असा घागर भरल्याचा आवाज मी इतक्या दुरूनही स्पष्ट ऐकला . नंतर पायऱ्यांवर शिंतोडे उडताहेत, कोणीतरी ओलेती स्त्री आपला पदर पिळते आहे . त्याचे ओघळ पायऱ्यांवरून पुन्हा पाण्यात ओघळताहेत . असाही भास मला होऊ लागला . मी डोळे चोळू लागलो . दुपारच्या वेळी मला एकटे पाहून अचानक कवितादेवी माझ्यावर प्रसन्न झाली कि काय असे मला वाटून गेले. मी आपला दगड विटांत रमणारा एक रुक्ष व्यवहारी माणूस . पण हळूहळू समोरच्या दृश्याचा अंमल माझ्या मनावर पडतो आहे असे मला वाटू लागले . मी जणू मनाने त्या जुनाट सरंजामी काळात पुन्हा जाऊन पोहचलो . आता मी बांधकामाची कंत्राटे घेणारा , शेअर बाजारात पैसे लावणारा एक सामान्य बिल्डर नव्हतो . तर मी होतो वैभवशाली घरंदाज ,बंदुकीच्या एका गोळीत वाघाला लोळविणारा एक सरदार . आता मला दिसू लागले कि ती स्त्री आपल्या अपार्थिव पावलांनी हळूहळू पायऱ्या चढून वर येत आहे . भर दुपारची वेळ होती . उन्हाची तिरीप माझ्या डोळ्यांवर येत होती . मला क्षणभर भोवळ आल्यासारखे झाले . डोळ्यांपुढे  क्षणिक अंधारी आली .…  आणि ती मला स्पष्ट दिसली ! उदास … वावेत सगळ्यात वरच्या पायरीवर येउन बसलेली . घागर शेजारी ठेवलेली . हनुवटीवर काही गोंदलेले आहे . कासोटा खोचलेले लुगडे गुढघ्यापर्यंत वर घेतलेले आहे . थकून भागून पदर ढळून  जिचा उर धपापतो आहे . जिने हिरव्या रंगाची चोळी घातली आहे . अशी कोण हि मलूल होऊन वावेच्या काठी बसली आहे ? तीच ती ! शंकाच नको बकुळाच ती !
                 मी शहारलो . अंगावर शर्ट चढवून घाईघाईने जिना उतरून खाली आलो . भर उन्हात धावत वावेच्या दिशेने गेलो . हो , ती अजूनही तिथेच बसलेली होती . मृगजळासारखी उन्हात वितळून नाही गेली . पण हे काय ? हिची घागर कुठे गेली ? हिची नऊवारी साडी चोळी कुठे गेली ? माझ्या समोर जीन्स टी शर्ट मधील हि कोण भलतीच स्त्री बसलेली आहे ? ओह माय गॉड ! हि तर रोझी !!
                    " रोझी ? तू इथे काय करते आहेस ?" मी किंचाळून विचारताच रोझी जणू स्वप्नातून जागं व्हावं तशी दचकली . " क …. काही नाही सर . गढीत जीव गुदमरल्यासारखं वाटत होतं . असं वाटत होतं कि हि गढी कणाकणाने आपल्याला पचविते आहे . म्हणून इथे मोकळ्या  येउन बसले . " रोझी म्हणाली .जवळच्या पहाडावर रानतुळस ,पुदिना बदिशेपिचा दरवळत असलेला सुवास सारे आकाश भारून टाकीत होता .
************
त्यानंतर उरलेला दिवसही कामातच गेला . दुपारी जेवण जरा जास्तच झालं होतं . झोपेचा अंमल आणि अती खाणं यामुळे असले भलभलते भास होतात . रात्री त्यामुळे कमीच जेवलो . आज ड्रिंक्सही घेतले नाही . झोपण्यापूर्वी उद्याच्या कामाचे डीटेल्स रोझीला द्यावेत म्हणून तिला बोलावून घेतले . खरतरं एकटेपणाची अनामिक भीती मला छळत होती . रोझीच्या सोबतीने जरा बरं वाटलं . रात्री उशिरापर्यंत माझं डिक्टेशन चालू होतं . अचानक मी रोझीला म्हटलं ," रोझी ; आता खूप उशीर झालाय . जा आता तू तुझ्या खोलीत . "  रोझीला  खूप आश्चर्य वाटले. पण ती लगेच उठली . नोटपॅड व पेन घेऊन लगेच खाली गेली . आज पुन्हा काल सारखे  भास होतात कि काय या भीतीने लवकर झोप लागली नाही .
                               जाग आली तेव्हा दिवस चांगलाच वर आला होता . गवाक्षातून उन्ह आत येत होती . खाली कसलीशी गडबड ऐकू येत होती . गवाक्षात जाऊन बघितलं . वावेताला गाळ  काढण्याचं काम पहाटेच सुरु झालं होतं .पण काहीतरी गडबड वाटत होती . मी लगबगीने खाली उतरून गेलो . " काही नाही साहेब; हाडांचा सापळा सापडला गाळात . बाईचा  असावा . खूपच जुना वाटतोय . एखादी मोलकरीण पाणी भरता भरता पडली असावी जुन्या काळात कधी तरी वावेत . तिचा सापळा  असावा . काही काळजी करू नका . जाळून टाकायची व्यवस्था करतो . पोलिसांची काहीच अडचण नाही साहेब . ती चिंताच नको ." देशपांडे सांगत होते .
                                                      … त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोझीने नोकरीचा राजीनामा दिला .   .
             

No comments:

Post a Comment