Tuesday, 23 December 2014

स्टँटीक बॉक्स

  

                                                                               -----  ©   -डॉ . अमित शिंदे 
                                      "कॉंग्रेजुलेशन , छान एम्ब्रियो तयार झालाय . आता याचे नीताच्या गर्भाशयात रोपण केले कि शी विल बे प्रेग्नंट! " असे मी जेव्हा नीता आणि अनिकेत यांना सांगितले तेव्हा त्यांच्याकडून मला अपेक्षित असलेली कुठलीही आनंदाची प्रतिक्रिया आली नाही . उलट मोठ्या पेचात सापडल्याचे भावच त्यांच्या चेहऱ्यावर उमटले .
                                       नीता आणि अनिकेतला मी खूप वर्षांपासून ओळखतो . दोघेही अतिशय हुशार आणि उच्चशिक्षित होते . कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांच्या प्रेमात असले आणि घरच्यांची त्यांच्या प्रेमाला पूर्ण संमती असली तरी त्यांनी लग्न तसे फार उशिरा केले होते . दोघेही प्रचंड करीयरीष्ट . दोघांनाही आय . टी . सेक्टर मध्ये चांगला जॉब होता . त्यातही निता अतिशय महात्वाकांशी होती . त्यामुळेच जॉब मिळाल्यावर जेव्हा अनिकेतने तिला प्रपोज केले तेव्हा तिने स्पष्ट सांगितले कि ती जर्मनीत एम . एस. करायला जाणार आहे . तिथून परतल्यावरच लग्नाचा निर्णय घेईल . जर्मनीत गेल्यावर  एम . एस . कम्प्लीट होता होता तिला जर्मन अकॅडेमिक एक्चेंज सर्विसेस ची रिसर्च  फेलोशिप मिळून ती बर्लिन युनिव्हर्सिटीत डॉक्टरेट करण्याकरिता गेली . तेव्हा खरेतर सर्वांनी अनिकेतला तिचा नाद सोडून लग्न करून घेण्याचा सल्ला दिला होता . पण त्याचेही करियर ऐन भारत होते आणि लग्न हि त्याची प्रायोरिटी नव्हतीच . त्यामुळे दोघेही स्थिरस्थावर झाल्यावर लग्न करेपर्यंत दोघाची पस्तीशी केव्हाच उलटून गेली होती .
                                               दोघांना जॉब मिळाले ते वेगवेगळ्या शहरात . त्यामुळे सुरुवातीला काही वर्षे प्लॅनिंग. मग एकाच शहरात दोघांचे जॉब अँड्जस्ट झाल्यावर फ्लॅट, कार झाल्यानंतर दोघांना बाळाचे वेध लागले . पण सहा महिने प्रयत्न करूनही दिवस जाईनात  म्हणून ते  दोघे माझ्याकडे ट्रीटमेन्ट साठी आले  . तसा मी त्यांचा फॅमिली गायन्याँकॉलॉजिस्ट असल्याने मी त्यांना लहानपणापासून  ओळखत होतो. दोघांच्याही टेस्ट नंतर असे लक्षात आले कि चाळीशीच्या जवळ पोहोचलेल्या अनिकेतच्या विर्यात शुक्राणूंची हालचाल आणि गती कमी झाली होती . बदलत्या जीवनशैलीचे तणावही याला कारणीभूत होते . निताचेही ओव्हुलेशन नियमित होत नव्हते . प्राथमिक तपासण्यांनंतर मी त्यांना आय . व्ही . एफ . अर्थात टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेन्टचा सल्ला दिला .
                             आय . व्ही . एफ . च्या पहिल्या दोन सायकल्स अयशस्वी झाल्यानंतर जेव्हा तिसऱ्या सायकलमध्ये गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा साहजिकच त्यांना खूप आनंद होईल अशी माझी अपेक्षा होती .पण " अरे बापरे ! हा मोठाच प्रश्न उभा राहिला ." या अनिकेतच्या उद्गाराने मला बुचकळ्यात टाकले .
" का ?तुम्हाला आनंद नाही झाला ?" मी त्यांना विचारले .
" आनंद झाला डॉक्टर ! पण झालं असं कि आमच्या कंपनीचे  न्यू योर्क च्या आय . बी . एन .शी काही टाय अप्स झाले आहेत . त्यानुसार मला पुढच्या महिन्यात यु . एस . ला पाठविण्याचे मँनेजमेन्ट ने ठरविले आहे . अॅन्ड इट्स अ लाइफ टाइम ऑपरचुनिटी फॉर मी. " नीता म्हणाली .
" पण भारतातच सेटल व्हायचा निर्णय तुम्ही मागेच घेतला होता ना ?" मी विचारले .
" यु . एस . मध्ये सेटल व्हायचा काही विचार नाही . पण हि संधी सोडली तर माझ्यासारखी मूर्ख मीच ठरेन  . दोनच वर्षांचा प्रश्न आहे पण भारतात परत आल्यावर ; माय करियर विल बी फ्लश  वीद सक्सेस . शिवाय प्रेग्नन्सिच्या कारणाने मी जर नकार दिला तर मँनेजमेन्टवर वाईट इम्प्रेशन पडेल आणि माझ्या करियरला कायमची खीळ बसेल . दे मे इवन फायर मी ." निता उत्तरली .
"तुमच्या वैयक्तिक निर्णयात मी ढवळाढवळ करू शकत नाही . पण हा एम्ब्रियो जर आपण इम्प्लांट केला नाही तर नंतर पुन्हा प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता खूप कमी आहे . एक डॉक्टर या नात्याने या गोष्टीची कल्पना तुम्हाला देणे हे मी माझे कर्तव्य समजतो ." मी दोघांना निर्वाणीचा इशारा दिला .
" डॉक्टर आम्हाला बाळ हवय हो ! असं नाही का करता येणार ? हा एम्ब्रियो तसाच ठेऊन नीता न्यू योर्क वरून परत आल्यावर तो तिच्या गर्भाशयात इम्प्लांट करायचा ?" अनिकेतने विचारले .
" हो , तसे तंत्रज्ञान आहे . त्याला एम्ब्रियो फ्रीझिंग असे म्हणतात . टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेन्टच्या वेळेस जेव्हा एकापेक्षा अधिक भ्रूण तयार होतात तेव्हा त्यापैकी एकाचे रोपण स्त्रीच्या गर्भाशयात करून उरलेले भ्रूण गोठविले जातात . गरज पडल्यास ते पुढच्या वेळेस स्त्रीच्या गर्भाशयात सोडता येतात किंवा काही जोडपे असे भ्रूण दुसर्या जोडप्यांना डोनेटही करतात . पण त्यात काही धोके आहे . हे तंत्रज्ञान कधीकधी अपयशीही ठरू शकते ." मी कल्पना दिली .
" आम्ही तयार आहोत डॉक्टर , शिवाय दुसरा पर्यायही नाही आहे ." नीता उत्तरली .
*******************
त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी नीता भारतात परतली . आता मात्र दोघांनाही नव्या पाहुण्याची उत्कंठा लागून राहिली होती . फ्रीझ केलेला एम्ब्रियो नीताच्या गर्भाशयात इम्प्लांट करण्यात आला . मला त्यात व्यंग निर्माण होण्याची भीती होती . सुदैवाने सर्व टेस्टस  पॉझीटिव्ह आल्या . गर्भाच्या वाढीवर माझे सोनोग्राफी द्वारे बारीक लक्ष होते . माझा प्रयोग यशस्वी झाला होता . सर्व काही व्यवस्थित होते . दिवसांमागून दिवस जाऊ लागले . डीलेवरीची तारीख जवळ येऊ लागली . एके दिवशी अचानक अनिकेतचा मला फोन आला . त्या दोघांना मला अर्जंट भेटायचे होते . गर्भाचीच काही समस्या निर्माण झाली असावी असे मला वाटले . मी त्यांना अपॉइन्टमेन्ट दिली .
" डॉक्टर , आपल्याला हि डीलेवरी पुढे नाही का ढकलता येणार ?" माझ्यासमोर बसल्या बसल्या अनिकेत म्हणाला .
" अरे हि बाळाची डीलेवरी आहे . निर्जीव मालाची नाही . " मी जर रागानेच म्हटले .
" सॉरी डॉक्टर . पण आम्हालाही बाळाची ओढ आहेच ना ! प्रॉब्लेमच तसा उभा राहिला आहे . रिसेशन मुळे नुकताच माझा जॉब गेलाय . बदललेल्या कामगार कायद्यांमुळे नीताला प्रेग्नन्सी लिव्ह मध्ये कुठलाही पगार मिळणार नाहीये . तेव्हा वी कान्ट अफोर्ड अरायवल ऑफ न्यू मेंबर इन अवर फॅमिली." अनिकेत ने समस्या सांगितली .
" हे बघ अनिकेत, दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०६० पर्यंत असे करता येत नसे . पण तुमच्या सुदैवाने असा शोध नुकताच लागला आहे . गर्भ जिवंत ठेऊन त्याची वाढ थांबवून डीलेवरी पुढे ढकलण्यासाठी एक इंजेक्शन मिळते . हे इंजेक्शन दर महिन्याला शिरेद्वारे घ्यावे लागते ." मी पर्याय सांगितला . दिवसेंदिवस कुटुंबसंस्था उध्वस्थ होत चालली आहे . एकमेकांना मदत करणे , नातीगोती सांभाळणे या सगळ्याला मागच्या शतकातच आहोटी लागली होती . आता तर या गोष्टी पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत . त्यामुळे प्रसुतीसारख्या घटनाही आयुष्यात खूपच ताण तणाव वाढवतात . आमच्या आयुष्यातील नेहमीच्या घटनाही बाजारपेठेच्या नियामांनीच नियंत्रित होऊ  लागल्या आहेत . म्हणतात ना , गरज हि शोधाची जननी आहे ! लोकांच्या गरजा लक्षात घेऊन असे संशोधन होऊ लागले आहे .
                                      नीताने हा इंजेक्शनचा पर्याय स्वीकारला . अवघडलेल्या स्थितीत नीता ऑफिसला जाऊ लागली . अनिकेतला नवी नोकरी मिळालीच नाही . पुढे त्याने स्वतःचा बिझनेस सुरु केला . व्यवसायात स्थिरस्थावर होईपर्यंत दोन वर्षे निघून गेली . दोन वर्षानंतर त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला . एव्हाना नीताची चाळीशी उलटून गेली होती . या वयातील बाळंतपण, त्यातही पहिली खेप , खूपच धोकादायक असते . अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा पूर्ण वापर करून तिचे सिझेरियन करण्यात आले . बाळ बाळंतीन यातून सुखरूप बाहेर पडल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला .
**************
त्यानंतर तीन महिन्यांनी मी स्वित्झर्लंडला सहलीला गेलो. तिथे अनपेक्षितपणे अनिकेत आणि नीता मला एका रिसोर्ट मध्ये भेटले . दोघेही सुटीची मजा घेत होते . पण त्यांच्यासोबत त्यांचे बाळ दिसत नव्हते .
"अरेच्चा ! तुम्ही इथे कसे ? आणि बाळ कुठे आहे ? " मी विचारले .
"काही नाही डॉक्टर . गेली काही वर्षे खूपच धावपळीची होती . त्यानंतर नीताची डीलेवरी ! बाळानेही सुरुवातीला खूप त्रास दिला . रात्र रात्र झोपत नसे . दोन अडीच वर्षांच्या प्रेग्नन्सीने नीताची पाठही खूप दुखायची . बाळाला बाहेरचं दुध लवकरच सुरु करण्याचा आम्ही डिसिजन घेतला . पण त्यानेही बाळाला सुरुवातीला खूप जुलाब झाले . या सगळ्याचा खूप स्ट्रेस आला होता . म्हणून म्हटलं ; लेट्स टेक अ ब्रेक . " अनिकेत सांगत होता.
" मग बाळाला काय पाळणाघरात ठेवले ?" माझा प्रश्न .
"नाही स्टँटीक बॉक्स मध्ये ठेवले ." अनिकेत उत्तरला .
"स्टँटीक बॉक्स?" मी आश्चर्याने विचारले .
"हुं , नुकताच शोध लागलाय त्याचा . इंडियात अजून मिळतही नाही , खास यु. एस . मधून मागविला हा बॉक्स आम्ही  . " अनिकेत सांगू लागला .
"मी समजलो नाही . स्टँटीक बॉक्स हा शब्द प्रथमच ऐकतो आहे मी . " मी म्हणालो .
" तुम्हाला माहित आहेच , हल्लीचं आयुष्य कसं डिमांडिंग आहे ते . आणि मुल वाढवणं काही कमी हेक्टिक काम नाही . त्यामुळे संशोधकांनी हा बॉक्स तयार केला आहे . या बॉक्स मध्ये मुल घातलं कि ते फ्रीझ होतं . त्याचा श्वासोश्वास , हृदय सुरु राहते पण ते हालचाल करीत नाही . या काळात ते अतिशय कमी उर्जा वापरते . त्यामुळे त्याला अन्नाचीही गरज नसते . याकाळात त्याचे वय सुद्धा स्थिर राहते . एकप्रकारच्या सुप्तावस्थेत जाते ते . दरम्यान पालक आपापली  महत्वाची कामे करून घेऊ शकतात . बॉक्स मधून बाहेर काढतात त्याची स्मृती आणि हालचाली पूर्ववत होतात .हिवाळ्यात अन्न मिळत नाही तेव्हा बर्फाळ प्रदेशातील प्राणी आणि गोठलेल्या तळ्यातील बेडूक हेच तंत्र वापरतात .  आमच्यासारख्या बिझी पालकांसाठी एक वरदानच आहे हा बॉक्स . या बॉक्स मध्ये काही तासांपासून काही वर्षांपर्यंत कितीही वेळ आपण बाळ ठेऊ शकतो . " अनिकेतने सांगितले .
***********************
त्यानंतर वर्षांमागून वर्षे गेली . मी माझ्या वयाची नव्वदी केव्हाच ओलांडली आहे . वाढत्या वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्यमान वाढले . साहजिकच प्रदीर्घ कंटाळवाणे म्हातारपण नशिबी आले . एकदा संध्याकाळच्या वेळेस पेन्शनर्स पार्क मध्ये गेलेलो असता एक सत्तरीचे जोडपे एका दोन अडीच वर्षाच्या लहान मुलाला खेळवत होते.
" अरे वा ! नातू वाटतं ?" मी सहज गप्पा माराव्यात म्हणून म्हणालो . आताशा एकमेकांशी प्रत्यक्ष बोलणे हि गोष्टच नामशेष झाली आहे असे वाटत होते . अहो शेजारी पाजारी सोडा पण नवरा बायको , बाप मुलगा हे देखील एकमेकांना व्हर्चुअल जगातच भेटत . त्यामुळे बाळाला खेळविणारे आजी आजोबा पाहून मला जरा अप्रूपच वाटले .
"अहो डॉक्टर तुम्ही ! ओळखलं नाही का आम्हाला ?" त्यातल्या स्त्रीने विचारले .
"वयोमानाप्रमाणे स्मृती  जरा  क्षीण झाली आहे खरी ! नाही ओळखू येत चेहरे लवकर ." मी ओळखण्याचा निष्फळ प्रयत्न करीत म्हणालो ." जुने पेशंट असे अवचित भेटतात आणि पंचायत होते .
"अहो मी अनिकेत , हि निता . तुम्हीही कसे ओळखणार म्हणा ! पंचवीस वर्षे केव्हाच उलटून गेली असतील भेटून . " खरेच कि , पांढरे केस आणि जीर्ण चेहेर्यातून मला हळू हळू ओळख पटू लागली  .
" ओह हो ! कमाल आहे ! त्या वेळेस इन्फर्टीलिटी ची ट्रीटमेन्ट घेणारे तुम्ही असे नातवाला खेळाविताना बघून खरेच आनंद वाटला . " मी समाधानाने म्हणालो .
" नाही डॉक्टर ! हा नातू नाही आमचा . हा तोच मुलगा आहे . तुमच्या  ट्रीटमेंट ने झालेला . विश्वजित ." नेहा म्हणाली. मी बुचकळ्यात पडलो .
"पण तो तर आता सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा असेल न ?" मी विचारले .
यावर दोघेही काही क्षण गप्प झाले . मग अनिकेत अपराधी चेहऱ्याने सांगू लागला . " ती आमची एक चूकच झाली . तुम्हाला तर माहित आहे . त्या काळात आम्ही प्रचंड बिझी होतो . माझा व्यवसाय नुकताच जोर पकडू लागला होता आणि नेहा करीयरच्या सर्वोच्च शिखरावर होती . सारख्या मिटींग्स , कॉनफ़रन्सेस, क्लाएनट्सशी चर्चा भेटीगाठी सतत चालू असायच्या . शिवाय कामाचाही प्रचंड स्ट्रेस असायचा . तेव्हा नुकताच मार्केटमध्ये लॉन्च झालेल्या  स्टँटीक बॉक्स चा आम्हाला खूपच आधार वाटू लागला . डेड लाईन चार दिवसांवर आली ? टाका बाळाला बॉक्स मध्ये . मिटिंग मध्ये महत्वाचं प्रेझेन्टेशन द्यायचे आहे ? टाका बाळाला बॉक्स मध्ये. चार दिवस बिझनेस टूर वर जायचं आहे ? टाका बॉक्स मध्ये . सुरुवातीला दोन चार दिवसांचा असलेला स्टँटीक बॉक्स मध्ये बाळाला टाकण्याचा कालावधी नंतर नंतर वाढू लागला . आजारपण , धंद्यात नुकसान , जॉब बदलणे , आलेले नैराश्य या कारणांनी विश्वजित महिनोंमहिने बॉक्स मध्ये राहू लागला . त्याची शी शु काढणे , आजारपणात रात्र रात्र जगणे , त्याचे मूड्स सांभाळणे या सगळ्यांसाठी त्या काळात आमच्याकडे वेळच नव्हता . कधी जागेची कमतरता , कधी आर्थिक अस्थिरता यामुळे आपण त्याला दर्जेदार सोई सुविधा देण्यात कुठे कमी पडू नये असे वाटायचे . मध्यंतरी काही वर्षे सतत युद्धाचे वातावरण होते . त्याचा दुष्परिणाम विश्वजितवर होऊ नये असे वाटायचे . त्यामुळे त्याला त्या काळात पूर्ण वेळ   स्टँटीक बॉक्स मध्येच ठेवले होते . कधी कधी आपण आपल्या जबाबदारीतून पळ काढतोय असं वाटायचं . पण हे सगळे आपण विश्वाजीतच्या भल्यासाठीच करतोय या विचाराने अपराधी भाव कमी व्हायचा. आपण मुलांना या जगात जन्माला घालतो पण आपली मुले आनंदाने वाढू शकतील असं जग कुठे आपण त्यांना देऊ शकतो ? आज ना  उद्या परिस्थिती  बदलेल , आपण आपल्या मुलाला अधिक चांगल्या जगात वाढवू असं वाटायचं . पण त्याचा परिणाम उलटाच झाला . आज आम्ही दोघांनी साठी ओलांडली मात्र आमचे बाळ अजून अडीच वर्षांचेच आहे . बाकी परिस्थिती  जैसे थे आहे . काल ज्या समस्या आमच्या पुढे होत्या त्या आजही आहेत . हे आमच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा आम्ही स्टँटीक बॉक्स फोडूनच टाकला . जग तर आपण बदलू शकत नाही मग आपणच बदलायचंआपल्या मुलांना अधिक चांगल्या काळात वाढविण्याऐवजी आहे त्या परीस्थितीत समाधान शोधायला आम्हीही शिकत आहोत आणि त्यालाही शिकविणार आहोत . "
                                              या सगळ्याशी अनभिज्ञ एकटाच स्वतःच्या विश्वात मश्गुल होऊन खेळणाऱ्या विश्वजीतकडे पाहून माझे डोळे भरून आले . तो आता स्टँटीक बॉक्स मध्ये नाही.  मात्र खेळात मग्न झाल्याने काळ जणू त्याच्यासाठी स्तब्द झाला आहे . त्याला काळजी फक्त या क्षणाची आहे . पण हा हळू हळू मोठा होईल . स्पर्धेचं युग त्याच्यावरही आपला अंमल चढवेल . तोही या उंदरांच्या शर्यतीत अथक धाऊ लागेल. मग त्याला आपल्या अति वृद्ध पण पुढारलेल्या विज्ञानाने आयुष्यमान वाढलेल्या आई वडिलांची अडचण होऊ लागेल . विश्वजित मोठा होऊन आपल्या आई वडिलांना वारंवार  स्टँटीक बॉक्स मध्ये टाकतो आहे आणि हळूहळू त्यांना स्टँटीक बॉक्समधून कधीच न काढण्याचा निर्णय त्याने घेतला आहे असे चित्र मला स्पष्ट दिसू लागले . 


1 comment:

  1. can we give this katha to editor Of ANURADHA DIWALI magazine for Diwali 2016 issue

    ReplyDelete